भुयारी गटार योजना लोकाभिमुखच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 09:42 PM2018-12-04T21:42:57+5:302018-12-04T21:43:20+5:30
केंद्र शासनाचे अमृत अभियानांतर्गत भुयारी गटार योजना तयार करण्याचे निर्देश प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने वर्धा शहरासाठी भुयारी गटार योजना तयार करण्याचे मान्य केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : केंद्र शासनाचे अमृत अभियानांतर्गत भुयारी गटार योजना तयार करण्याचे निर्देश प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने वर्धा शहरासाठी भुयारी गटार योजना तयार करण्याचे मान्य केले. सदर योजनेच्या माध्यमातून वर्धा शहरातील विविध भागात कामे सुरू असून लोकाभिमुख असलेल्या भुयारी गटार योजनेच्या कामे पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी केले आहे.
नगर पालिका यांच्याकडे योग्य तो तांत्रिक कर्मचारी वर्ग नसल्यामुळे भुयारी गटार योजना करण्यात तज्ञ असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचेकडून योजना तयार करून त्या योजनेचे कामावर त्यांचकडूनच देखरेख करून घेण्यात यावी. तसेच योजना कशाप्रकारे तयार करावी याबाबत केंद्र सरकार तसेच संबंधित विभागाकडून सीपीएचईईओ मॅन्युअल नुसार योजना तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. सदर सुचनांना केंद्रस्थानी ठेवून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून वर्धा शहराचे सर्वेक्षण करण्यात आले. शहराची भौगोलिक रचना लक्षात घेता शहराचे सहा झोन तयार करण्यात आले. शिवाय एसटीपी झोनची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर आराखडे, नकाशे यांची तपासणी करून सचिव स्तरावरून मंजूरी प्रदान करण्यात आली. योजनेची किंमत १०१.२२ कोटी, वित्तीय आकृतिबंध, केंद्रशासन अनुदान ५० टक्के ५०.६१ कोटी, राज्य शासन अनुदान २५ टक्के २५.३० कोटी, लोकवर्गणी २५ टक्के २५.३० कोटी आहे. योजनेमध्ये ८५ कि़मी लांबीची मलवाहिनी टाकणे, डबल वाल करोगेटेड पाईप १५० मि.मी. ते २५० मि.मी. तसेच आर.सी.सी. पाईप ३०० मि.मी. ते ८०० मी.मी. साईजपर्यंत टाकुन १७ एमएलडी विक्रमशिला झोनमध्ये व बोरगाव झोन मधील नाल्यावर बंधारा बांधने व ५ ठिकाणी रेल्वे रूळाखालून पाईप लाईन टाकणे प्रस्तावित आहे. सन २०५० चे प्रस्तावित लोकसंख्येनुसार ही योजना आहे. विविध बाबी लक्षात घेऊन संपूर्ण शहरात टाकायवयाच्या पाईप लाईनचा व्यास निश्चित झाला आहे. पाण्याचे स्त्रोत दुषित होऊ नये यासाठी ही भुयारी गटार योजना फायद्याची असल्याचे नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी कळविले आहे.
योजनेचे फायदे
डासांची निर्मिती कमी होईल. शहर स्वच्छ व सुंदर होण्यास मदत होईल. दुर्गंधीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागणार नाही. पाण्याचे स्त्रोत दुषित होणार नाही, असे नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी कळविले आहे.