आदेशाविनाच भूदानातील जमिनीचे हस्तांतरण

By admin | Published: September 9, 2015 02:07 AM2015-09-09T02:07:21+5:302015-09-09T02:07:21+5:30

आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान यज्ञात प्राप्त जमिनीचे वाटप भूदान मंडळामार्फत केले जाते.

Land transfer of land without order | आदेशाविनाच भूदानातील जमिनीचे हस्तांतरण

आदेशाविनाच भूदानातील जमिनीचे हस्तांतरण

Next

तलाठ्याने वापरले एसडीओंचे अधिकार : एकाच्या जमिनीवर दुसऱ्यानेच उचलले कर्ज
वर्धा : आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान यज्ञात प्राप्त जमिनीचे वाटप भूदान मंडळामार्फत केले जाते. माजी सैनिक, भूमिहीन शेतकरी, शेतमजुरांना या जमिनी दिल्या जातात. यातील जमिनींची विक्री, हस्तांतरण होत नाही; पण तलाठ्याने वरिष्ठांचे अधिकार वापरत सातबारावर खोडतोड करून जमीन दुसऱ्याच्या नावावर केली. इतकेच नव्हे तर सदर महिलेने त्यावर कर्जाचीही उचल केली. तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने न घेतलेले कर्ज फेडण्याची व जमीन गमविण्याची वेळ महिलेवर आली.
आर्वी तालुक्यातील मौजा कृष्णापूर येथील शेत सर्व्हे क्र. ९/१, आराजी १.०४ हेक्टर आर शेतजमीन ३० जून २००९ मध्ये सुमित्रा नारायण चौधरी रा. करंजी (काजी) यांना प्राप्त झाली. ३१ डिसेंबर २००१ नुसार सदर जमिनीचे हस्तांतरण करण्यात आले. या जमिनीवर सदर महिला शेतकरी शेती करीत होत्या. दरम्यान कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्याचे आदेश नसताना तलाठ्याने ही जमीन सुमित्र व्यंकटी कासार रा. कृष्णापूर यांच्या नावाने करण्यात आली. यासाठी कुठल्याही कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली नाही तर केवळ सातबारावर खोडतोड करून हा प्रकार करण्यात आला. शेतीचा अभिलेख हा नियमानुसार वरिष्ठांच्या मंजुरीने वा आदेशाने दुरूस्त होणे गरजेचे असते; पण तलाठ्यानेच वरिष्ठांचे अधिकार वापरून हा प्रकार केल्याचे निदर्शनास आले.
हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही तर सुमित्रा व्यंकटी कासार यांनी याच सातबाराचा वापर करीत राष्ट्रीयकृत बँकेतून कर्जाची उचलही केली. याबाबत तलाठी दप्तर निरीक्षणाची जबाबदारी मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व प्रसंगी जिल्हाधिकारी यांची असते; पण सर्वच स्तरावरून या प्रकरणाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. जमीन ही सुमित्रा नारायण चौधरी यांची तर नंतर गाव नमूना १२ हा सुमित्रा व्यंकटी कासार यांच्या नावाने लिहिला गेला. या संपूर्ण प्रकारामुळे कासार यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड चौधरी यांच्यावर आली आहे.
या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी सुमित्रा चौधरी यांनी केली आहे. याबाबत तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षक खरांगणा (मो.) यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. या निवेदनातून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
भूदान मंडळाकडून वितरित जमिनीचे घोळ सुरूच
भूदान मंडळाकडून वितरित जमिनींच्या वितरणातील घोळ थांबतच नसल्याचे दिसते. कृष्णापूर येथे तर एका महिलेची शेती परस्पर दुसऱ्याच महिलेच्या नावे करण्यात आली. या प्रकारामुळे लाभार्थी महिलेवर संकट कोसळले आहे. शिवाय न घेतलेले कर्ज फेडण्याची वेळ त्या महिलेवर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
एसडीओंच्या कारवाईकडे लक्ष
भूदान जमीन घोटाळ्यामध्ये जिल्ह्यातील तीनही उपविभागीय अधिकाऱ्यांना चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत; पण अद्याप कुठल्याही हालचाली झाल्याचे दिसत नाही. आर्वी उपविभागीय अधिकाऱ्यांकडेही काही प्रकरणे प्रलंबित असून त्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तहसीलदारासह ठाणेदाराला निवेदन
भूदानात मिळालेल्या जमिनीच्या प्रकरणात झालेल्या अनागोंदी प्रकरणी लाभार्थ्यांने आर्वी तहसीलदारासह खरांगणा पोलीस ठाण्यात निवेदन सादर केले आहे.

Web Title: Land transfer of land without order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.