खासगीत १० महिन्यांत तब्बल ३,६०२ सीझर

By admin | Published: March 6, 2017 12:58 AM2017-03-06T00:58:27+5:302017-03-06T00:58:27+5:30

सुरक्षित मातृत्त्वाकरिता शासनाच्यावतीने अनेक योजना अंमलात आणल्या जात आहेत. शासनाच्या योजनांची बरसात होत असताना ...

In the last 10 months, 3,602 cisers | खासगीत १० महिन्यांत तब्बल ३,६०२ सीझर

खासगीत १० महिन्यांत तब्बल ३,६०२ सीझर

Next

शहरी भागात २३ खासगी प्रसूतीगृह : सर्वत्र आरोग्य विभागाने दिलेल्या प्रमाणाला छेद
रूपेश खैरी वर्धा
सुरक्षित मातृत्त्वाकरिता शासनाच्यावतीने अनेक योजना अंमलात आणल्या जात आहेत. शासनाच्या योजनांची बरसात होत असताना शहरी भागात खासगी प्रसूती गृहांची संख्याही वाढत आहेत. जिल्ह्यात असलेल्या २३ खासगी प्रसतीगृह आणि दोन मोठ्या खासगी रुग्णालयात येत असलेल्या गर्भवतींचे सिझरच होत असल्याचे समोर आले आहे. या १० महिन्यांत तब्बल ३ हजार ६०२ सिझर झाले आहे. यात सावंगी आणि सेवाग्राम रुग्णालयाचाही समावेश आहे. सावंगी व सेवाग्राम या दोन रुग्णालयात २ हजार १९७ तर खासगी प्रसूतीगृहात तब्बल १,४०५ सिझर झाले आहे.
या तुलनेत मात्र शासकीय रुग्णालयात सिझरिंगचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले आहे. शहरी भागात आणि ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात या १० महिन्यांत केवळ ५९६ मातांचे सिझर झाले आहे. जिल्ह्यात सध्या सिझरचे प्रमाण वाढले आहे. यामागची कारणे अनेक आहेत. जिल्ह्याचा विचार केल्याच गत १० महिन्यांत तब्बल १४ हजार ८७३ प्रसूती झाल्या आहेत. त्यातील ४ हजार १९८ सिझर गर्भवतींचे झाले आहेत. शहरी भागात असलेल्या रुग्णालयात या दहा महिन्यांत २ हजार ७३५ प्रसूती झाल्या आहेत. यातील १ हजार ४०५ प्रसूती सिझर झाल्या आहेत. या तुलनेत शहरी भागात असलेल्या शासकीय सेवेतील रुग्णालयात ४ हजार ५८४ प्रसूती झाल्या आहेत. यातील केवळ ५९६ प्रसूती सिझर झाल्या आहेत.
शहरी भागातील प्रसुतीगृहातील सिझरींगचे प्रमाण वाढत असून यामागचे कारण काय, हे मात्र न उलगडणारे कोडे आहे. असे असले तरी सुरक्षित माता आणि बाळाकरिता सिझरचा निर्णय घेण्यात येत असल्याचे काही तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. तसेच अनेक रुग्ण अडचणीच्यावेळी खासगी रुग्णालयात जात असल्याचे एक कारण समजल्या जात आहे. यामुळेच सिझर करण्याची संख्या अधिक असल्याचे बोलले जात आहे. या शिवाय मोठी अडचण आल्यास जिल्ह्यात दोन मोठे रुग्णालय असल्याने नागरिकांची धाव येथेच असते. यामुळे या रुग्णालयात सिझरची नोंद अधिक असल्याचे दिसून आले आहे.

शासनाने दिलेल्या प्रमाणानुसार १५ ते २५ टक्केच सीझर योग्य
प्रसूती संदर्भात शासनाने दिलेल्या प्रमाणानुसार रुग्णालय शासकीय असो वा खासगी येथे येणाऱ्या गर्भवतींची नैसर्गिक प्रसूती करण्यावर भर देण्यात यावा अशा सूचना आहेत. यात अडचण येत असल्यास सिझर करण्याच्या सूचना आहे. मात्र आज सिझरचे प्रमाण सर्रास वाढत आहे. शासकीय रुग्णालयात या वर्षात प्रसूतीची टक्केवारी १४ एवढी असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. या तुलनेत खासगी रुग्णालयात मात्र त्याची टक्केवारी ८०.५० टक्के असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. या टक्केवारीवरून खासगी रुग्णालयात शासनाच्या प्रमाणाला बगल देण्यात येत असल्याचे दिसून आले आहे.

सर्वाधिक खासगी प्रसूतीगृह वर्धेत
जिल्ह्याचा शहरी भाग म्हणून ओळख असलेल्या वर्धा, हिंगणघाट, आर्वी व पुलगाव या चार ठिकाणी तब्बल २३ खासगी प्रसूतीगृहे आहेत. यात सर्वाधिक वर्धा शहरात आहे. त्याची संख्या १२ आहे. तर हिंगणघाट येथे ७, आर्वीत ३ आणि पुलगाव येथे १ प्रसूतीगृह असल्याची नोंद जिल्हा सामान्य रुग्णालयात आहे. या २३ प्रसूतीगृहात महिलांची प्रसूती होत असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आहे.
तज्ज्ञ म्हणतात, सीझरमुळे अनेक समस्यांवर मात
प्रसूतीदरम्यान अडचण आल्यास सिझर करण्याचा निर्णय होतो. या निर्णयामुळे अनेक समस्यांवर मात होत आहे. सिझरची सेवा सुरू झाली त्या काळापासून माता व बालमृत्यूसह मतीमंद मुले जन्माला येण्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे स्त्री रोग तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.

नैसर्गिक प्रसूतीचे प्रमाण शासकीय रुग्णालयात अधिक
जिल्ह्यातील शासकीस आणि खासगी रुग्णालयात झालेल्या प्रसूतीपैकी १० हजार ६७५ प्रसूती नैसर्गिक झाली आहे. यात शहरी भागात असलेल्या शासकीय रुग्णातील ३ हजार ९८८ तर खासगी प्रसूती गृहात १३२० प्रसूतींचा समावेश आहे. उर्वरीत प्रसूती सेवाग्राम व सावंगी (मेघे) या दोन मोठ्या रुग्णालयासह ग्रामीण भागात असलेल्या आरोग्य केंद्रातील असल्याचे समोर आले आहे. यातही शासकीय रुग्णालयाची संख्या अधिक आहे.
सावंगी व सेवाग्राम रुग्णालयात २,१९७ सीझर
वर्धा जिल्ह्यात आरोग्याची सेवा पुरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे सावंगी व सेवाग्राम येथील दोन वैद्यकीय महाविद्यालये आहेत. वर्धेतील शासकीय असो वा खासगी रुग्णालये येथे अडचणीच्या स्थितीत आलेल्या रुग्णाला या दोन रुग्णालयाचा रस्ता दाखविण्यात येतो. यामुळे येथे होणाऱ्या शस्त्रक्रीया महत्त्वाच्या ठरतात. या दोन रुग्णालयात या दहा महिन्यात २ हजार १९७ सिझर झाले आहे.

सोयींमुळे अनेकांचा कल खासगी सेवेकडे
शहरी भागातील सर्वांचा कल खासगी आरोग्य सेवेकडे वाढत आहे. त्याचे कारणही तसेच आहे. शासकीय आरोग्य सेवेत नसलेले तज्ज्ञ, रुग्णालयात गेल्यावर येणाऱ्या अडचणी, वेळेवर सेवा पुरविण्यात असमर्थ असलेली यंत्रणा या सर्व कारणांमुळे शहरी भागातील नागरिक खासगी सेवेकडे वहत आहे. याच कारणाने त्यांच्याकडून शासकीय रुग्णालयाच्या सेवेला दुय्यम समजल्या जाते. यामुळेच की काय हा प्रकार वाढत आहे. शिवाय आज सर्वांना आरामदाय औषधोपचार हवा आहे, ही बाब शासकीय रुग्णालयात मिळणे शक्य नाही, हे ही एक कारण समजल्या जात आहे.

शासनाच्या निर्देशानुसार महिन्याकाठी म्हणा की वर्षाकाठी सिझरची टक्केवारी होणाऱ्या प्रसूतीच्या १५ ते २५ टक्क्याच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. वर्धेत शासकीय रुग्णालयात तसे होत आहे. मात्र खासगी रुग्णालयात याचे प्रमाण वाढत आहे. यामुळे नागरिकांनी त्यांची मानसिकता बदलविणे गरजेचे झाले आहे.
- डॉ. पुरूषोत्तम मडावी, जिल्हा शल्य चिकित्सक

कोणताही डॉक्टर विनाकारण सिझर करणार नाही. प्रत्येकांना बाळ आणि माता सुखरूप हवी असते. आज नवनवीन तंत्रज्ञान विकसित झाले आहे. यातून गर्भातच बाळ आणि त्याला असलेल्या त्रासाची माहिती मिळते. गर्भातच काही कॉम्प्लीकेशन दिसल्यास सिझरचा निर्णय घेतल्या जातो. यामुळेच आज बाळ आणि मातामृत्यसह मतीमंद बालक जन्माला येण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. वास्तविक नॉर्मल डिलीवरीपेक्षा सिझर डॉक्टरकरिता त्रासदायक आहे. यात दोन्ही जीवांची काळजी घ्यावी लागते. शासकीयच्या तुलनेत खासगीकडे रुग्णांची धाव अधिक आहे. शिवाय क्रीटीकल पेशंट खासगीत अधिक येतात. यामुळे सिझरचा निर्णय घेतल्या जातो.
- डॉ. स्मिता पावडे, स्त्री रोग तज्ज्ञ, वर्धा

Web Title: In the last 10 months, 3,602 cisers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.