साश्रू नयनांनी अखेरचा निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 11:41 PM2018-11-21T23:41:25+5:302018-11-21T23:42:02+5:30

देवळी तालुक्यातील सोनेगाव (आबाजी), केळापूर व जामणी या गावकऱ्यांचा मंगळवारचा दिवस हा बॉम्बच्या हादऱ्याने उजाडला. यात सोनेगाव (आबाजी) येथील तीन तर केळापूरच्या दोघांना जीव गमवावा लागला. यामुळे या दोन्ही गावावर शोककळा पसरली होती.

The last message to the tears of Shishu Nayana | साश्रू नयनांनी अखेरचा निरोप

साश्रू नयनांनी अखेरचा निरोप

googlenewsNext
ठळक मुद्देगहिवरले मन, हळहळले गाव : गंभीर रुग्णांची प्रकृती स्थिर, अतिदक्षता विभागात उपचार सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : देवळी तालुक्यातील सोनेगाव (आबाजी), केळापूर व जामणी या गावकऱ्यांचा मंगळवारचा दिवस हा बॉम्बच्या हादऱ्याने उजाडला. यात सोनेगाव (आबाजी) येथील तीन तर केळापूरच्या दोघांना जीव गमवावा लागला. यामुळे या दोन्ही गावावर शोककळा पसरली होती. या पाचही जणांवर मंगळवारी सायंकाळी उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आल्याने गावकऱ्यांचा हा दिवस शोकाकूल वातावरणात मावळला.
पुलगावच्या दारुगोळा भांडाराच्या संरक्षित क्षेत्रात जबलपूर येथून आणलेले बॉम्ब निकामी करण्याचे काम सुरु ंअसताना सकाळी ७.१० मिनिटानी मोठा स्फोट झाला. या स्फोटात सोनेगाव (आबाजी) येथील विलास लक्ष्मणराव पचारे (४०), नारायण श्यामराव पचारे (५५), प्रभाकर रामराव वानखेडे (४०) या तिघांचा तर केळापूर येथील प्रवीण प्रकाश मुंजेवार (२५) व राजकुमार राहुल भोवते (२३) यांच्यासह जबलपूर येथील उदयपीर सिंग (२७) यांचा मृत्यू झाला. तसेच आजपर्यंत जवळपास १८ जखमींवर उपचार सुरु आहेत. या घटनेने जिल्ह्यातच नाही तर देशभरात खळबळ उडाली आहे. घटनेनंतर या दोन्ही गावांमध्ये भयाण शांतता पसरली होती. मृतक व जखमींच्या नातेवाईकांसह नागरिकांनी रुग्णालयात धाव घेतली. शवविच्छेदनानंतर मृतदेह ताब्यात दिल्यानंतर मृतकांच्या घरी व परिसरात चांगलाच आक्रोश होता. सोनेगावात तीन तर केळापूरातून दोन अंत्ययात्रा एकाच वेळी निघाल्याने अनेकांची मनं गहिवरही. या दु:खात सारं गाव हळहळल. सर्वांनी या पाचही जणांना आपापल्या गावात साश्रू नयनांनी शेवटचा निरोप दिला. कुणाचा भाऊ, कुणाचा पती, कुणाचा मुलगा अचानक निघून गेल्याने परिवाराचा टाहो थांबता थांबेना... त्यांच्या अंत्यदर्शनासाठी परिसरातील नागरिकांनीही गर्दी केली होती.
जखमींची संख्या पोहोचली १८ वर
स्फोटात जखमी झालेल्यांची संख्या वाढली असून ती आज १८ पोहोचली आहे. मंगळवारी सकाळी रुग्णालयात १२ जणांना दाखल करण्यात आले होते. त्यातील दोेघे दगावल्याने १० जणांवर उपचार सुरु होते.दरम्यान दुपारी २ तर बुधवारी सकाळी सहा रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. सध्या सोनेगाव (आ.) येथील विकास बेलसरे, संदीप पचारे, रुपराव नैताम, हनुमान सराटे,प्रशांत मरस्काल्हे,लहू होले, निलेश मून, विक्रम ठाकरे, अमित भोवते, केळापुरचे दिलीप निमगरे, मनोज मोरे,मनोज सयाम, प्रशांत मुंजेवार तर जामणीचे प्रवीण सिडम, प्रशांत मडावी, इस्माईल शहा आणि कॅम्पचा कर्मचारी प्रदीप काकडे उपचार घेत असल्याची समजते.

सावंगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल असलेले प्रशांत मुंजेवार, विकास बेलसरे यांच्या छातीची शस्त्रक्रिया करण्यात आली. दिलीप निमगडे, प्रवीण सिडाम यांच्या पोटाची शस्त्रक्रिया करण्यात आली. तसेच मनोज मोरे यांच्या पायाचे तर प्रशांत मरस्कोल्हे यांच्या हाताचे हाड तुटल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. अमीत भोवते यांच्याही पायाचे हाड तुटल्याने त्यावरही शस्त्रक्रिया करणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. सध्या गंभीर जखमी असलेल्या या सहाही रुग्णांची प्रकृती स्थिर असून रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी सेवा देण्यासाठी अहोरात्र झटत आहे.

Web Title: The last message to the tears of Shishu Nayana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.