पाटबंधारे विभागाच्या वेधशाळेला शेवटचे वेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 11:50 PM2018-09-26T23:50:38+5:302018-09-26T23:52:56+5:30
हवामानाचा अंदाज वर्तविण्यासाठी असलेली पाटबंधारे विभागाची वेधशाळा गेल्या सहा वर्षांपासून बंदिस्त असल्यामुळे शेवटचे वेध लागल्याची स्थिती दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेधशाळा नियमित सुरू करण्याची मागणी केली आहे.
अमोल सोटे।
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : हवामानाचा अंदाज वर्तविण्यासाठी असलेली पाटबंधारे विभागाची वेधशाळा गेल्या सहा वर्षांपासून बंदिस्त असल्यामुळे शेवटचे वेध लागल्याची स्थिती दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेधशाळा नियमित सुरू करण्याची मागणी केली आहे. वरिष्ठ अधिकाºयांचे दुर्लक्षित धोरण कारणीभूत ठरत आहे.
पाटबंधारे विभाग वर्धा यांच्या अंतर्गत आष्टी तलावाच्या परिसरात लघु सिंचन उपविभागाने १९८४ मध्ये वेधशाळा उभारली. निसर्गरम्य वातावरणात टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या वेधशाळेत पाटबंधारे विभाग बाराही महिने कर्मचारी कार्यरत ठेवत होते. २०१२ पर्यंत एक कर्मचारी परिवारासह येथे वास्तव्याला होते. त्यानंतर येथे कुणीही आले नाही. कुलूपबंद अवस्थेत फाटक लावून आहे. गाजर गवत आणि रायमुन्यांच्या वेलीने येथे ताबा घेतला आहे. आष्टी तालुक्यामध्ये महत्त्वाचे योगदान असलेली ही वेधशाळा आज मात्र हवामानाचा अंदाज वर्तविण्याऐवजी स्वत:च्या भविष्याचाच वेध सांगत आहे. १९८४ साली वेधशाळा सुरू झाल्यावर पर्जन्यसृष्टीचा अंदाज तंतोतंत खरा ठरायचा. पाणी किती आले त्याची नोंद मिलिमिटरमध्ये व्हायची. किती दिवस कसे वातावरण राहील यासह खुप सारी माहिती विचारायला शेतकरी यायचे. मात्र या साºया आनंदाला ग्रहण लागते आणि झिरो बजेट खर्चाची वेधशाळा आज बंदिस्त जीवन जगत आहे. अधिकारी, कर्मचारी यांच्यातील विश्वासाची दरीही वाढत गेल्याने वेधशाळाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत गेले.
साहित्य गेले चोरीला
वेधशाळेचे सर्व उपकरण नादुरुस्त आहे. काही उपकरण चोरीला गेले. यामध्ये सुर्य प्रखरता बॉल, बोर्ड, पारे या वस्तुंचा समावेश आहे. याप्रकरणी उपविभागीय अभियंता दामोदरे, शाखा अभियंता वाघ यांना संपर्क केला असता भ्रमणध्वनी उचलला नाही. सदर वेधशाळा तात्काळ सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा शेतकºयांनी दिला आहे.