प्रचार अंतिम टप्प्यात, प्रलोभनांचा पाऊस सुरू
By admin | Published: October 11, 2014 11:11 PM2014-10-11T23:11:28+5:302014-10-11T23:11:28+5:30
प्रचाराचे युद्ध आता अंतिम टप्प्यात येवून पोहचले असून रॅलीच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शनावर उमेदवारांनी अधिक भर दिल्याचे दिसून येते. वर्धेत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस, आर्वीत काँग्रेस, भाजप
रॅलीतून शक्तिप्रदर्शन : प्रमुख राजकीय पक्षांची प्रचारात सरशी
राजेश भोजेकर - वर्धा
प्रचाराचे युद्ध आता अंतिम टप्प्यात येवून पोहचले असून रॅलीच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शनावर उमेदवारांनी अधिक भर दिल्याचे दिसून येते. वर्धेत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस, आर्वीत काँग्रेस, भाजप व एक अपक्ष, देवळीत काँग्रेस, भाजप तर हिंगणघाटात राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना आणि बसपाने आघाडी घेतली आहे. ही आघाडी मतदानाच्या दिवसापर्यंत कायम राहते वा हे चित्रही पालटते, याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे.
देवळीत काँग्रेस आणि भाजपात, हिंगणघाटात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस, आर्वीत काँग्रेस आणि भाजपात, तर वर्धेत भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड चुरस बघायला मिळत आहे. ही लढत या राजकीय पक्षांमध्ये होईल, असे एकंदर चित्र आहे.
पहिल्यांदाच या निवडणुकीत नामांकन दाखल करण्याच्या दिवसापर्यंत राजकीय पक्षांचे उमेदवार ठरले नव्हते. परिणामी भाजप, काँग्रेस, राकाँ आणि शिवसेना या चारही प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांना प्रचाराला संधीच मिळाली नव्हती. हातात पक्षाचा ‘एबी’ फार्म मिळाल्यानंतर नामांकन दाखल करण्यासाठी धावपळ करावी लागली. प्रचार साहित्याची जुळवाजुळव करण्यातही बरेच दिवस निघून गेले.
ज्यांना युती आणि आघाडी कायम राहील आणि आपल्यालाच उमेदवारी मिळेल, अशी आशा होती. अशांनी प्रचार साहित्याची जुळवाजुळव करुन ठेवली होती. मात्र त्यांचेही अंदाज चुकले. त्यांना ऐनवेळी ‘आघाडी’ वा ‘युती’ हे शब्द प्रचार साहित्यातून वगळण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली.
अडचणीची बाब म्हणजे, प्रचार करण्यासाठी वाहनांकरिता परवानग्या घेण्यातही प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. उमेदवारांची अंतिम यादी झाल्यापासून खऱ्या अर्थाने प्रचाराच्या तोफा धडाडायला सुरुवात झाली. आता प्रचाराला गती आली आहे. ही आघाडी कोण कायम ठेवतो, याकडे लक्ष लागले आहे.