‘धाम’तून पाटबंधारे सोडणार अखेरचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 11:39 PM2019-06-13T23:39:41+5:302019-06-13T23:41:01+5:30
वर्धा शहरासह परिसरातील १३ गावांमधील नागरिकांची पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी महाकाळी येथील धाम प्रकल्प फायद्याचा ठरतो; पण सध्या याच प्रकल्पात नाममात्र जलसाठा शिल्लक आहे. असे असले तरी नागरिकांची पाण्याची मागणी लक्षात घेता या प्रकल्पातील शेवटचे पाणी वर्धा पाटबंधारे विभाग येत्या काही दिवसात सोडणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा शहरासह परिसरातील १३ गावांमधील नागरिकांची पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी महाकाळी येथील धाम प्रकल्प फायद्याचा ठरतो; पण सध्या याच प्रकल्पात नाममात्र जलसाठा शिल्लक आहे. असे असले तरी नागरिकांची पाण्याची मागणी लक्षात घेता या प्रकल्पातील शेवटचे पाणी वर्धा पाटबंधारे विभाग येत्या काही दिवसात सोडणार आहे. उल्लेखनीय म्हणजे धाम प्रकल्पातील मृत जलसाठ्याची उचल करण्याच्या प्रस्तावाला शासनाकडून अद्याप हिरवी झेंडी मिळालेली नसल्याचे बोलले जाते. त्यामुळे वेळीच पाऊस न आल्यास येत्या काही दिवसात पाणी समस्या रौद्ररुप धारण करण्याची शक्यता आहे.
महाकाळी येथील धाम प्रकल्पाची ३२८.६०० दलघमी पाणी साठवण क्षमता आहे. परंतु, सध्या स्थितीत या प्रकल्पात केवळ ०.५ दलघमी उपयुक्त पाणी साठा आहे. नागरिकांची पिण्याच्या पाण्याची मागणी लक्षात घेता सदर प्रकल्पातील मृत जलसाठ्याची उचल करण्याचा प्रस्ताव वर्धा पाटबंधारे विभागाने तयार केला. शिवाय तो जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात मुंबई दरबारी शासनाकडे सादर केला आहे.
परंतु, या प्रस्तावावर अद्यापही कुठलाही विचार झाला नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे मृत जलसाठ्याची उचल कशी करावी, असा प्रश्न सध्या वर्धा पाटबंधारे विभागाला भेडसावत आहे. मृत जलसाठ्याची उचल करून तो गेट द्वारे सोडण्याचे वर्धा पाटबंधारे विभागाच्या विचाराधीन आहे. जलाशयात असलेल्या ०.५ दलघमी उपयुक्त जलसाठ्यासह जास्तीत जास्त २ दलघमी मृत पाणी साठा सोडण्याचा मानस पाटबंधारे विभागाचा आहे. येत्या काही दिवसात पाणी सोडण्यात येणार असून हे शेवटचेच ठरणार आहे. सुमारे २.५ दलघमी पाणी सोडल्यानंतर जलाशयातून आणखी किती पाण्याची उचल करता येईल याचा अंदाज पाटबंधारे विभागाला येणार आहे. त्यामुळे नागरिकांनीही उपलब्ध पाण्याचा काटकसरीनेच वापर करणे गरजेचे आहे.
मृत जलसाठा ९ दलघमी
धाम प्रकल्पात सध्या ०.५ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे. असे असले तरी या जलाशयाच्या निर्मितीनंतर एकही वेळा त्यातील गाळ काढण्यात आलेला नाही; पण यंदा जिल्हा प्रशासनाने धाम प्रकल्प गाळमुक्त करण्याचा विडा उचलला आहे. उपयुक्त जलसाठा संपल्यानंतर या प्रकल्पात जास्तीत जास्त ९ दलघमी मृत जलसाठा राहू शकतो, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, आतापर्यंत एकही वेळा या प्रकल्पातील गाळ काढण्यात न आल्याने सध्या या प्रकल्पात ९ दलघमी मृत जलसाठा आहे काय याबाबतही ठामपणे अधिकाºयांना सांगणे कठीण झाले आहे. विशेष म्हणजे मृत जलसाठ्याची पूर्णपणे उचल करता येत नाही.
पाणी येण्यास लागतो दोन दिवसांचा कालावधी
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि वर्धा नगर पालिका प्रशासन येळाकेळी तसेच पवनार येथील धाम नदीच्या पात्रातून पाण्याची उचल करते. सदर दोन्ही संस्था सुमारे ३६ हजार कुटुंबियांना याच पाण्याचा पुरवठा करते. असे असले तरी महाकाळी येथून सोडण्यात आलेले पाणी येळाकेळी व पवनार पर्यंत येण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागतो.
धाम प्रकल्पात अतीशय अल्प उपयुक्त जलसाठा शिल्लक असल्याने मृतसाठ्याची उचल करण्यासाठीचा प्रस्ताव शासनदरबारी पाठविण्यात आला होता. त्याला शासनाकडून मंजूरी मिळाली आहे. असे असले तरी नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीनेच वापर करावा.
- विवेक भिमनवार, जिल्हाधिकारी, वर्धा.