कारंजा तालुक्यात कुष्ठरोग रूग्ण शोध मोहिमेला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2016 01:19 AM2016-09-21T01:19:27+5:302016-09-21T01:19:27+5:30
केंद्र शासनाद्वारे राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत तालुक्यात कुष्ठरोग रूग्ण शोध मोहिमेचा शुभारंभ करण्यात झाला.
९७ आशा शोधणार ९७ गावात कुष्ठरुग्ण
कारंजा : केंद्र शासनाद्वारे राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत तालुक्यात कुष्ठरोग रूग्ण शोध मोहिमेचा शुभारंभ करण्यात झाला. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पडवे यांच्या हस्ते मोहिमेस प्रारंभ झाला.
तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, सारवाडी व कन्नमवार अंतर्गत ९७ गावांमध्ये ९२ हजार पेक्षा जास्त लोकसंख्येची कुष्ठरोग दृष्टीकोणातून पाहणी करण्यात येणार आहे. १९ सप्टेंबर ते ४ आॅक्टोबर २०१६ या कालावधीत ९७ आशा स्वयंसेविका व त्याच गावांतील तेवढेच पुरूष स्वयंसेवक प्रत्यक्ष गृहभेटीतून प्रत्येक कुटुंबातील एका एका सदस्याची तपासणी करणार आहेत. \फ्लॅशकार्ड द्वारे कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे शोधली जाणार आहेत. नवीन संशयीत कुष्ठरूग्णाचे निदान करून त्यांना त्वरित मोफत औषधोपचार देण्यात येणार आहे. यासाठी ग्रामीण रूग्णालय, कारंजा येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुमित अंबादे, प्रा.आ. केंद्र सारवाडीचे वद्यकीय अधिकारी डॉ. आर. एम. पाटेकर, डॉ. एम.के. चापे, आरोग्य कर्मचारी, आरोग्य सहायक, पर्यवेक्षक व अधिकारी प्रयत्नशील आहेत.
कारंजाचे गट विकास अधिकारी, बी. डब्ल्यू. यावले यांच्या अध्यक्षतेखाली तालुका कुष्ठरोग सनियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे. यात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पडवे, सचिव गट शिक्षण अधिकारी बी.टी. बोळणे एकात्मिक बाल विकास अधिकारी आशा माहाडिक, पं. स सदस्य किशोर उकंडे आणि गुरूदेव सेवा मंडळाचे गोपाळ विरूळकर यांचा समावेश आहे.
सदर मोहीम यशस्वी करण्यासाठी समाजातील अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले व डॉ. मंगेश रेवतकर, डॉ. लक्षदीप पारेकर प्रयत्नशील आहेत.(तालुका प्रतिनिधी)