रेल्वे पादचारी पुलासह मालगोदाम कार्यालयाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 09:53 PM2019-01-22T21:53:10+5:302019-01-22T21:53:32+5:30
येथी रेल्वे स्थानकावर १ कोटी ८० लाख रुपयांचा निधी खर्च करून पादचारी उड्डाणपूल व माल गोदाम कार्यालय तसेच व्यापारी कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचे लोकार्पण आज खा. रामदास तडस यांच्या हस्ते करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : येथी रेल्वे स्थानकावर १ कोटी ८० लाख रुपयांचा निधी खर्च करून पादचारी उड्डाणपूल व माल गोदाम कार्यालय तसेच व्यापारी कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचे लोकार्पण आज खा. रामदास तडस यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी आ. समीर कुणावार, रेल्वे विभागाचे सहाय्यक प्रबंधक त्रिलोक कोठारी, विभागीय वरिष्ठ व्यवस्थापक कुशकिशोर मिस्त्रा, वरिष्ठ विभागीय अभियंता पाटील, धर्मेंद्र आचार्य, प्रा. किरण वैद्य आदींची उपस्थिती होती. मनोगत व्यक्त करताना आ. कुणावार म्हणाले की, मागील चार वर्षांच्या कालावधीत विविध महत्त्वपूर्ण रेल्वे गाड्यांचे थांबे हिंगणघाट आणि सिंदी रेल्वे येथे मिळाले आहेत. त्यासाठी खा. तडस यांचे मोलाचे सहकार्य मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले. तर खा. तडस म्हणाले की, वर्धा लोकसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत. वर्धा लोकसभा मतदार संघाच्या विकासासाठी केंद्र शासनाकडून न भूतो न भविष्य इतका मोठ्या प्रमाणात निधी मिळाला असल्याचे सांगितले. हिंगणघाट रेल्वे स्थानकावर आणखी काही रेल्वे गाड्यांना थांबे मिळावे, अशी मागणी नागरिकांची आहे. ती मागणी पूर्णत्त्वास जाण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासनही यावेळी खा. तडस यांनी दिले.