कारवायांच्या नावावर आष्टी तालुक्यात एलसीबीचा धुडगूस
By admin | Published: December 31, 2014 11:28 PM2014-12-31T23:28:23+5:302014-12-31T23:28:23+5:30
पोलिसांचा तिसरा डोळा असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सध्या आष्टीत तालुक्यात चांगलाच धुडगूस घातला आहे. कारवाया दाखविण्यासाठी हे पथक कुणाच्याही घरात झडती
पोलिसात तक्रार : महिला शेतकऱ्याच्या घरून ४० हजार पळविले
आष्टी(श.) : पोलिसांचा तिसरा डोळा असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सध्या आष्टीत तालुक्यात चांगलाच धुडगूस घातला आहे. कारवाया दाखविण्यासाठी हे पथक कुणाच्याही घरात झडती व संशयाच्या नावावर घुसून नाहक त्रास देण्याचा प्रताप करीत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. याबाबत एका पीडित शेतकरी महिलेने पोलीस अधीक्षकांना पाठविलेल्या तक्रारीवरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या या अफलातून कारवाया पुढे आल्या.
सदर तक्रारीनुसार, दि.२३ डिसेंबर रोजी आष्टी येथील महिला शेतकरी सुमन मारोती पाटील यांनी मौजा डोंगरगाव येथील तीन एकर शेतीतील कापूस विकला. मिळालेला ४० हजार रुपयांचा चुकारा घरी आणून ठेवला आणि ती घराला कुलूप लावून परत शेतात गेली. दरम्यान दुपारी ३ वाजता वर्धा येथील स्थानिक गु्न्हे शाखेच्या तिचे घर गाठून कुलूप तोडून आत प्रवेश केला. माहिती मिळताच सदर महिला घरी आली. यावेळी या पथकाने तिचा मुलगा प्रमोद याच्याबाबत माहिती विचारली. तेव्हा तिने पटत नसल्यामुळे मुलगा विभक्त राहतो, असे सांगितले. तरीही घराची झडती घेतली. अन्नधान्य फेकून दिले. डब्यामंधील पदार्थ जमिनीवर अस्ताव्यस्त फेकून त्यावर पाणी टाकले. तसेच पलंगाच्या गादीखाली कापसाचे चुकाऱ्याचे ४० हजार जबरदस्तीने काढून घेतले. अश्लील भाषेत शिवीगाळही केली. काहीएक न ऐकून न घेता ते निघून गेले. लगेच तक्रार नोंदविण्यासाठी पोलीस ठाण्यात गेली. स्टेशन डायरीवर कार्यरत जमादार खोब्रागडे याने तक्रार घेण्यास नकार दिला. ही बाब त्या पथकाला सांगितली. पुन्हा पथकाने महिलेचे घर गाठून ४ हजार रूपये परत केले. उर्वरित ३६ हजार रूपये देत नाही, जे करायचे आहे ते कर, असे धमकावल्याचा, आरोप सदर महिलेने पोलीस अधीक्षकांना पाठविलेल्या निवेदनात केला आहे. याची प्रत आष्टी पोलिसांना दिली आहे. याप्रकरणातील कारर्वाकडे लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी)