सभास्थळी बैलबंडीतून पोहोचले नेते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 11:34 PM2017-12-08T23:34:43+5:302017-12-08T23:35:10+5:30
यवतमाळ जिल्ह्यातून निघालेली हल्लाबोल पदयात्रा वर्धा जिल्ह्यातील केळझर येथे शुक्रवारी पोहोचली येथे दुपारी ३.३० वाजता बाजार चौकात जाहीर सभा झाली.
आॅनलाईन लोकमत
केळझर : यवतमाळ जिल्ह्यातून निघालेली हल्लाबोल पदयात्रा वर्धा जिल्ह्यातील केळझर येथे शुक्रवारी पोहोचली येथे दुपारी ३.३० वाजता बाजार चौकात जाहीर सभा झाली. या सभेला हल्लाबोल पदयात्रेत सहभागी असलेले सर्व मान्यवर नेते बैलबंडीतून दाखल झाले. सभेनंतर बुद्धविहारात नेत्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले.
सेलू येथून सकाळी पदयात्रेला प्रारंभ झाला दुपारी १ वाजता ही पदयात्रा केळझर येथे पोहोचली. पदयात्रेत महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खा. सुप्रिया सुळे, आ. भास्कर जाधव, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, आ. प्रकाश गजभिये, अनिल देशमुख, सुरेश देशमुख, चित्रा वाघ आदी नेते सहभागी होते. त्यानंतर स्थानिक यशवंत महाविद्यालयाच्या प्रांगणात पोहोचली. तेथे दुपारचे जेवण घेतल्यानंतर तेथून बैलबंडीच्या मिरवणूकीसह नेते सभास्थळी दाखल झाले. या सभेत बोलताना अजीत पवार यांनी केंद्र व राज्यातील भाजपच्या सरकारवर जोरदार टिका केली. शेतकºयाचा सातबारा कोरा झाला नाही. दररोज आत्महत्या वाढत आहे. आघाडी सरकारच्या काळात अनेक शेतकरी हिताचे निर्णय शरद पवार व आम्ही राज्यात घेतले, तसे सांगितले. या सभेला माजी आमदार सुरेश देशमुख, गुलाबराव गावंडे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. प्रास्ताविक मिलिंद हिवलेकर यांनी केले. संचालन महानाम रामटेके यांनी केले. येथील सभेच्या आयोजनाची जबाबदार युसुफ शेख गुरूजी यांनी सांभाळली.
केळझर येथील बुद्ध विहारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जावून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर ही पदयात्रा खडकीकडे रवाना झाली. खडकी येथे शुक्रवारी रात्री मुक्काम करून शनिवारी पदयात्रा सेलडोह मार्गे नागपूर जिल्ह्यात दाखल होणार आहे.
साहेब कापूस वेचण्यासाठी बाई यायला तयार नाही
वर्धा - राष्ट्रवादी काँग्रेसची हल्लाबोल पदयात्रा सेलू येथून केळझरकडे शुक्रवारी सकाळी रवाना झाली. यावेळी आ.धनंजय मुंडे, जयंत पाटील व खा. सुप्रिया सुळे यांनी शेतकºयाशी शेतात जावून संवाद साधला. गत वर्षीपेक्षा यावर्षी कापसाच्या उत्पादन ७५ टक्के फरक पडला आहे. एक बाई किमान १५ किलो कापूस वेचत होती. यंदा कापसाच्या बोंडचं सडून गेले आहे. त्यामुळे कापूस वेचासाठी महिला मजूर (बाई) शेतात यायला तयार नाही. एका एकरात १५ क्विंटल होत होता. यंदा तो होण्याची शक्यता नाही, असे सेलू परिसरातील शेतकºयाने नेत्यांना सांगितले. त्यानंतर पदयात्रा केळझरकडे रवाना झाली.