असंसर्गजन्य आजारांत महिलांची आघाडी
By admin | Published: April 19, 2015 01:51 AM2015-04-19T01:51:10+5:302015-04-19T01:51:10+5:30
जिल्ह्यात एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ पर्यंत राबविलेल्या असंसर्गजन्य रोगनियंत्रण कार्यक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला़ ...
प्रभाकर शहाकार ल्ल पुलगाव
जिल्ह्यात एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ पर्यंत राबविलेल्या असंसर्गजन्य रोगनियंत्रण कार्यक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला़ लाखावर लोकांनी तपासणी करून घेतली. प्राप्त अहवालात मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग, हृदयरोग या आजाराचे रुग्ण पुरुषांपेक्षा महिलाच अधिक दिसून आल्या़ नागरिकांचा प्रतिसाद मिळत असताना रोगनियंत्रण कार्यक्रमातील कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली जात असल्याने सर्वच बुचकाळ्यात आहेत़
देवळी तालुक्यात नाचणगाव परिसरात मधुमेह, रक्तदाब, कर्करोग या आजाराचे फेबु्रवारी व मार्च या केवळ दोन महिन्यांत ५९५ महिला व ३८२ पुरूष या तीन आजाराने ग्रस्त असल्याचे समोर आले आहे़ या अहवालानंतर असंसर्गजन्य आजाराने पुरुषांपेक्षा महिलांना अधिक प्रमाणात ग्रासल्याचे वास्तव असताना संबंधित यंत्रणा या कार्यक्रमात कार्यरत कर्मचाऱ्यांना मासिक वेतनासाठी वेठीस धरत असल्याचे दिसते़ शिवाय आता ३१ मार्च रोजी काही कर्मचाऱ्यांच्या सेवाही संपुष्टात आणल्या. परिणामी, एप्रिल २०१५ च्या पंधरवड्यात कर्मचाऱ्याअभावी काही प्राथमिक आरोग्य केंद्रांत असंसर्गजन्य रोगनियंत्रणाचा कार्यक्रम ठप्प आहे. नागरिकांना निरोगी आयुष्य जगता यावे म्हणून राष्ट्रीय असंसर्गजन्य रोगनियंत्रण कार्यक्रम जिल्ह्यात आॅगस्ट २०११ पासून कार्यरत झाला; पण दीड-दोन वर्षांपासून ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांत हा कार्यक्रम चालू झाला. यात जवळपास सर्वच आरोग्य केंद्रावर एनसीडी अंतर्गत एक वैद्यकीय अधिकारी, एक परिचारिका, असे दोन तर ग्रामीण रुग्णालयात या दोघांव्यतिरिक्त प्रयोगशाळा तंत्रज्ञ, डाटा एन्ट्री आॅपरेटर, असे चार वा अधिक कर्मचारी तैनात झाले. या नॉन कॉन्टीजियस डिसीज कार्यक्रमात ३० वर्षावरील ओपीडीमध्ये येणाऱ्या संपूर्ण रुग्णांची रक्तशर्करा तपासणी व उच्च रक्तदाब तपासणी मोफत केली जात होती. मधुमेह, रक्तदाब, रक्तशर्करा, कर्करोग, पक्षाघात, हृदयरोग या आजारांची तपासणी संबंधित कर्मचारी करीत होत़ संदर्भसेवेसाठी काही संशयित गंभीर रुग्णांना सेवाग्राम रुग्णालयात चिकित्सा व उपचारासाठी पाठविले जात होते़ या कार्यक्रमांतर्गत रुग्ण तपासणीनंतर रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसून येते. एका आरोग्य केंद्राच्या फेब्रु-मार्चच्या तपासणी अहवालावरून महिलांमध्ये मधुमेह, उच्चरक्तदाब, कर्करोग या आजारांचा आलेख वाढता आहे़ असे असताना ग्रामीण भागात रुग्णांना मोफत मिळणारी रक्तदाब तपासणी व रक्तशर्करा तपासणी सुविधा कर्मचाऱ्यांअभावी खंडीत झाली. परिणामी या कार्यक्रमात कार्यरत कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट आले़ शिवाय ग्रामस्थ रुग्णांची कुचंबना होत आहे़