प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीला गळती
By admin | Published: July 23, 2016 02:38 AM2016-07-23T02:38:20+5:302016-07-23T02:38:20+5:30
चार वर्षांपूर्वी ७१ लाख २८ हजार रूपये खर्च करून येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत बांधली.
निकृष्ठ बांधकाम झाल्याचे शिक्कामोर्तब : जि. प. च्या चौकशी समितीने केली प्रत्यक्ष पाहणी
रोहणा : चार वर्षांपूर्वी ७१ लाख २८ हजार रूपये खर्च करून येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत बांधली. सदर इमारतीतील सर्वच कक्षात स्लॅब गळतीमुळे पावसाळ्यात पाणी साचते. संपूर्ण इमारतीतील कॉलम व भिंतीला तडे गेले आहेत. भिंतीवर लावलेल्या टाईल्स पडण्याच्या मार्गावर आहेत. जमिनीलाही भेगा गेल्या आहेत. सदर बांधकामाबाबत जि.प. सदस्य हितेंद्र बोबडे यांनी वारंवार जि.प.च्या सभांमधून प्रश्न उपस्थित केला. अखेर २१ जुलैला जि. प. ने नियुक्त केलेल्या चौकशी समितीने प्रत्यक्ष पाहणी करून सदर बांधकाम निकृष्ठ दर्जाचे झाले असल्याचे शिक्कामोर्तब केले.
सदर इमारतीचे बांधकाम राष्ट्रीय स्वास्थ अभियानांतर्गत करण्यात आले होते. काम खासगी ठेकेदाराकरवी करून घेतले असले तरी त्यावर बांधकाम विभागातील अभियंत्याचे नियंत्रण होते. सदर इमारत पाथमिक आरोग्य केंद्र प्रशासनाच्या ताब्यात ३१ डिसेंबर २०१२ ला कागदोपद्धी देण्यात आली. बांधकाम करताना अनेक कक्षामधील तळाला योग्य भराव न दिल्यामुळे जागोजागी जामिनीला भेगा पडल्या आहेत. इमारती भोवती बांधलेल्या नाल्यांचा उतार न काढल्याने पावसाचे पाणी नालीतून वाहून जाण्याऐवजी परिसरातच साचते. संपूर्ण इमारतीत स्लॅबवर चढण्यासाठी कुठेही अंतर्गत जीना नसल्याने सिडीचा आधार घेवून चौकशी समितीच्या सदस्यांनी स्लॅबची पाहणी केली. संपूर्ण स्लॅबवर पॉलीमर वॉटर प्रुफींग करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
चौकशी समितीने बांधकामाच्या वेळी ज्या कुंभारे नावाच्या उपअभियंत्याचे नियंत्रण होते, त्यांना उपस्थित राहण्यास सांगितले होते. त्यांच्यासमोर बांधकामसंबंधीच्या कागदपत्राची शहानिशा केली असता बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यावर कार्यकारी अभियंता लोंढे यांनी अनेक त्रृटी काढल्याचे लक्षात आले.या त्रृटी पूर्ण केल्या असल्या तर बांधकाम दर्जाहीन झाले नसते. याबाबत विचारले असता उपअभियंता कुंभारे योग्य उत्तरे देवू शकले नाही. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची जूनी इमारत खराब झाली झाल्याने नवीन इमारत बांधण्यात आली. पण नवी इमारत अल्पावधीतच नव्यापेक्षाही खराब झाल्याचे बोलल्या जात आहे. चार वर्षांपासून शस्त्रक्रिया कक्ष खराब असल्याने येथे शस्त्रक्रिया होत नाही. अभियंता लोंढे यांनी काढलेल्या त्रृटींची पूर्ती करून न घेताच ठेकेदाराची पूर्ण देयके अदा केल्याने शासनाचा निधी व्यर्थ गेला आहे. चौकशी समितीच्या अहवालावर सर्वांचे लक्ष लागले आहे.(वार्ताहर)