कठीण कार्य करण्यासाठी अध्यात्म शिकलो..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 12:36 PM2019-01-15T12:36:11+5:302019-01-15T12:36:58+5:30
आम्हाला कठीण परिस्थितीत काम करण्यासाठी अध्यात्म शिकावे लागले. दोन वर्षांनी आमच्यावर विश्वास बसला व कामाला गती मिळाली. त्यातून कल्याणकारी कार्य करता आले, असे प्रतिपादन डॉ. प्रकाश आमटे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आदिवासी जमात निरपेक्ष जीवन जगते. चोऱ्या नाही, अत्याचाराच्या घटना आणि खूनही नाही. ते किती सुसंस्कृत होते, परंतु अंधश्रद्धा होत्या. त्यांना अंधश्रद्धेतून बाहेर काढायचे होते. ते शिकलेल्या माणसांवर विश्वास ठेवत नव्हते, परंतु आम्ही निराशेचा शब्द उच्चारला नाही. भयावह परिस्थिती होती. आम्हाला कठीण परिस्थितीत काम करण्यासाठी अध्यात्म शिकावे लागले. दोन वर्षांनी आमच्यावर विश्वास बसला व कामाला गती मिळाली. त्यातून कल्याणकारी कार्य करता आले, असे प्रतिपादन डॉ. प्रकाश आमटे यांनी केले.
जय महाकाली शिक्षण संस्था, अग्निहोत्री ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूशन्स, वर्धाच्यावतीने येथे संक्रांती स्नेहमिलन व सेवा सत्कार समारंभ सोमवारी पार पडला. समारोहाचे उद्घाटक म्हणून डॉ. प्रकाश आमटे बोलत होते. कार्यक्रमाला अतिथी म्हणून डॉ. मंदाकिनी आमटे उपस्थित होत्या अतिथी म्हणून चंद्रपूरचे माजी नगराध्यक्ष गयाचरण त्रिवेदी ऊर्फ धुन्नू महाराज उपस्थित होते. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष शंकरप्रसाद अग्निहोत्री होते. यावेळी महारोगी सेवा समिती वरोरा या संस्थेस जय महाकाली शिक्षण संस्थेच्या वतीने शंकरप्रसाद अग्निहोत्री यांच्या हस्ते १ लाखाचा निधी भेट देण्यात आला. मंचावर संस्था उपाध्यक्ष शिवकुमारी अग्निहोत्री, सचिव सचिन अग्निहोत्री, पूजा अग्निहोत्री, सपना त्रिवेदी, नीता जगन्नाथ शिंदे, डॉ. प्रविरराज त्रिवेदी, रमेश मुरडीव, डॉ. अशोक बिरबल जैन, डॉ. राजेश आसमवार, डॉ. अरुणा जैन, श्रीराम शर्मा आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सचिन अग्निहोत्री यांनी केले. संस्थेविषयी माहिती प्रा. प्रफुल्ल दाते यांनी दिली. या सोहळ्यात बुलडाणा को-आॅप. सोसायटीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांना सहकारनिष्ठा जीवनगौरव पुरस्कार आणि आमदार जगन्नाथ शिंदे याच्या वतीने नीता शिंदे यांचा आरोग्यनिष्ठा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.