रामनगरवासीयांना लीजमुक्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 10:20 PM2019-07-25T22:20:08+5:302019-07-25T22:20:32+5:30
शहरातील रामनगरात जवळपास १ हजार ६०० पेक्षा अधिक भूखंड असून सर्व जागा लीजवर असल्याने त्यांना मालकीहक्क मिळाला नाही. त्यामुळे मुळ लीजधारकांसह ज्यांच्या नावे भूखंड आहेत, त्या सर्वांना लीजमुक्त करुन मालकी हक्क देण्यात यावा, या मागणीकरिता रामनगरातील अनेकांत स्वाध्याय मंदिरातून रामनगर लीजमुक्त संघर्ष समितीव्दारे महामोर्चा काढून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना साकडे घालण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरातील रामनगरात जवळपास १ हजार ६०० पेक्षा अधिक भूखंड असून सर्व जागा लीजवर असल्याने त्यांना मालकीहक्क मिळाला नाही. त्यामुळे मुळ लीजधारकांसह ज्यांच्या नावे भूखंड आहेत, त्या सर्वांना लीजमुक्त करुन मालकी हक्क देण्यात यावा, या मागणीकरिता रामनगरातील अनेकांत स्वाध्याय मंदिरातून रामनगर लीजमुक्त संघर्ष समितीव्दारे महामोर्चा काढून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना साकडे घालण्यात आले.
नगरपालिकेने १९३१ ला सिंदी (मेघे) मौजातील शेत सर्व्हे क्रमांक ११०, ११४ आणि १०४ ही जागा विकत घेतली. त्यावर ७०७ भूखंड पाडण्यात आले. ते सर्व भूखंड लीजवर नागरिकांना देण्यात आले. यावेळी लीज डीड करताना भूखंडाच्या आकारमानानुसार रक्कमही घेण्यात आली. हे सर्व भूखंड लीजवर असतानाही १९९५ पर्यंत खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरु होते. परंतु नंंतर बंद झाल्याने व्यवहार पुर्ववत व्हावे आणि लीजचे नूतनीकरण करावे, अशी मागणी लीजधारकांनी वारंवार केली होती. २०१४ मध्ये आ. डॉ. पंकज भोयर यांनी यासंदर्भात पाठपुरावा केल्याने २०२१ पर्यंत लीजचे नूतनीकरण करण्यात आले. परंतु नूतनीकरण २०२१ पर्यंत असल्याचे कारण देत राष्ट्रीयकृत व इतर बँक कर्ज देण्यास मनाई करतात. त्यामुळे भूखंडधारकांना मालकी हक्क द्यावे तसेच वंशपरंपरेने जे लोक त्या भूखंडाचा उपभोग घेत आहे त्यांचाही सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी मागणीही रामनगर लिजमुक्ती संघर्ष समितीच्या वतीने पालकमंत्री बावनकुळे यांना दिलेल्या निवेदनातून केली. यावेळी रामनगर लीजमुक्ती संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा न.प.चे उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर, नगरसेवक संतोष ठाकूर, जयंत सालोडकर, प्रशांत इंगळे तिगावकर, सुरेश श्रीरंगवार, वंदना भूते, दिपीका आडेपवार, प्रशांत कोल्हे, श्याम मुंदडा, विशाल तिवारी, अभिषेक तिवारी, श्रीकांत वाघ, राजेश खुपचंदानी, सुरेश दातीर, अरुण आस्कर यांच्यासह लिजधारक उपस्थित होते.