पट्टेदार वाघाने केले युवकाला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2022 05:00 AM2022-03-10T05:00:00+5:302022-03-10T05:00:13+5:30
लक्ष्मण हा बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे शेळ्यांसाठी चारा आणण्यासाठी गावाजवळच असलेल्या तलाव रस्त्यावरील शेतात गेला होता. तो शेळ्यांसाठी चारा कापत असताना गव्हाच्या उभ्या पिकात लपून असलेल्या पट्टेदार वाघाने त्याच्यावर हल्ला चढविला. लक्ष्मण याने आरडाओरड केली असता परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. या घटनेत लक्ष्मण याचा जागीच मृत्यू झाला. वाघाने लक्ष्मणला गतप्राण केल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांसह वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घाडगे) : शेळ्यांसाठी चारा आणण्यासाठी गेलेल्या युवकावर पट्टेदार वाघाने हल्ला करून त्यास गतप्राण केले. ही घटना बुधवारी सकाळी तालुक्यातील कन्नमवारग्राम शिवारात घडली असून, लक्ष्मण महादेव हुके (३५) असे मृत युवकाचे नाव आहे.
लक्ष्मण हा बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे शेळ्यांसाठी चारा आणण्यासाठी गावाजवळच असलेल्या तलाव रस्त्यावरील शेतात गेला होता. तो शेळ्यांसाठी चारा कापत असताना गव्हाच्या उभ्या पिकात लपून असलेल्या पट्टेदार वाघाने त्याच्यावर हल्ला चढविला. लक्ष्मण याने आरडाओरड केली असता परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. या घटनेत लक्ष्मण याचा जागीच मृत्यू झाला. वाघाने लक्ष्मणला गतप्राण केल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांसह वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या घटनेची नोंद वनविभागाने घेतली आहे. मागील दोन वर्षांत कारंजा तालुक्यातील ही चौथी घटना आहे. यापूर्वी आगारगाव येथे युवकाला, तर राहटी येथे गुरख्याला तसेच नांदोरा येथे एका व्यक्तीला वन्य प्राण्याने ठार केले आहे.
हुके कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर, गावात हळहळ
- लक्ष्मण हुके हा भूमिहीन असून तो रोजमजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकलत असे. इतकेच नव्हे तर त्याने उदरनिर्वाहासाठी शेळीपालनाची जोड दिली होती; पण या घटनेमुळे हुके कुटुंबावर दु:खाचा डोंगरच कोसळला आहे.
मृताच्या कुटुंबीयांना दिली तातडीची ५० हजारांची मदत
- घटनेनंतर संतप्तांनी लक्ष्मणचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्यावर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मृत लक्ष्मणच्या कुटुंबीयांना तातडीची शासकीय मदत म्हणून ५० हजार रुपयांचा धनादेश दिला.
संतप्तांनी मोडली वनविभागाच्या नावाने बोटे
- कन्नमवारग्राम हे गाव जंगलव्याप्त भागात असून नेहमीच या भागात वन्यजीव आणि मानवांत संघर्ष होतात. या भागातील वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी असतानाही त्याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यावेळी संतप्तांनी केला. त्यामुळे काही काळाकरिता परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बुधवारी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
लक्ष्मण हुके याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. मृताच्या कुटुंबीयांना ५० हजारांची तातडीची मदत दिली असून शासकीय नियमांनुसार पाच लाखांची शासकीय मदत देण्यात येईल. शिवाय मृताच्या पत्नीला रोजमजुरीच्या कामावर घेतले जाणार आहे. मानव-वन्यजीव संघर्ष टाळता यावा, या हेतूने वनरक्षकाच्या नेतृत्वात पाचसदस्यीय पथकाची नेमणूक करण्यात येणार आहे.
- गजानन बोबडे, साहाय्यक वनसंरक्षक, वर्धा.