दोन दिवसांपासून पट्टेदार वाघांचा शेतात ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 10:24 PM2018-04-05T22:24:42+5:302018-04-05T22:24:42+5:30
खरांगणा वनपरिक्षेत्राच्या सुसूंद शिवारातील वासुदेव चितोङे आणि भीमराव डवले यांच्या शेतात दोन वाघांनी ठिय्या मांडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आकोली : खरांगणा वनपरिक्षेत्राच्या सुसूंद शिवारातील वासुदेव चितोङे आणि भीमराव डवले यांच्या शेतात दोन वाघांनी ठिय्या मांडला आहे. यामुळे भाजीपाला पिकाची काढणी व सिंचन खोळंबले असून शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
मागील एक महिन्यापासून पट्टेदार वाघ तर कधी वाघाच्या जोडीने शिकारीचा सपाटा लावला आहे. यात वनविभागाचीही दमछाक होत आहे. चितोडे यांचे शेत मदना धरणाच्या मागील भागात आहे. मागील दोन दिवसांपासून वाघाने शेतात ठिय्या मांडला आहे. शेतातील भाजीपाला काढणीला आला असून पाण्याअभावी भाजीपाला पीक करपू लागले आहे. याबाबत शेतकरी चितोडे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी ताल्हन यांना माहिती दिली आहे.
बुधवारी रंजीत निकोडे व ईश्वर महाडोळे हे दोघे शेतात जात होते. दरम्यान, त्यांना भीमराव डवले यांच्या शेताजवळ पट्टेदार वाघ दिसल्याने दोघांनीही गावाकडे धूम ठोकली. चितोडे व डवले यांच्या शेतात दोन वेगवेगळे वाघ असल्याने शेतीची मशागत कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. वनविभाग रात्रीपासून गस्तीवर असला तरी वाघांना न्यू बोर व्याघ्र प्रकल्पात कसे हुसकावून लावायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.