कर्जमाफी मिळालेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्ज द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 12:03 AM2019-06-13T00:03:46+5:302019-06-13T00:04:20+5:30
राज्य शासनाने शेतकऱ्यांची बँकेतील पत निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली. जिल्ह्यातील ८० हजार २९० शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असून सर्व बँकांनी पात्र आणि अर्ज करणाऱ्या सर्व गरजू शेतकऱ्यांना या खरीप हंगामात कर्ज वितरण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी दिलेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राज्य शासनाने शेतकऱ्यांची बँकेतील पत निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली. जिल्ह्यातील ८० हजार २९० शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असून सर्व बँकांनी पात्र आणि अर्ज करणाऱ्या सर्व गरजू शेतकऱ्यांना या खरीप हंगामात कर्ज वितरण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी दिलेत.
पीक कर्ज वाटप, कर्जमाफी, पीएम किसान आदी योजनांचा आढावा जिल्हाधिकारी यांनी घेतला. सर्व बँकांनी त्यांच्या शाखानिहाय पीक कर्ज वाटपाची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात द्यावी. तसेच एखाद्या शेतकऱ्यांचा पीक कर्ज नाकारण्याचे कारण द्यावे. रिझर्व्ह बँकेच्या कोणत्याही परिपत्रकामुळे शेतकऱ्यांना पीककर्ज वितरण करताना अडचणी येत असतील तर त्याची माहिती तात्काळ शासनाला कळविण्यात यावी. शेतकऱ्यांना वेळीच कर्ज पुरवठा होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘अर्ज द्या कर्ज घ्या’ हे अभियान राबविण्यात येत आहे. शेतकºयांना बँकेमध्ये येणाऱ्या अडचणीचे निराकरण करणे आणि अभियानाच्या योग्य अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील सर्व बँकेच्या १३९ शाखांसाठी प्रत्येक शाखानिहाय संपर्क अधिकऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तहसीलदारांनी त्यांच्या तालुक्यातील प्रत्येक बँक मॅनेजर आणि संपर्क अधिकारी यांची आठवड्यातून एकदा बैठक घेऊन कर्ज वाटपाचा आढावा घ्यावा, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सागितले. आजपर्यंत केवळ ६.८ टक्केच पीक कर्ज वाटप झाले असून याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून बँकांनी शाखानिहाय मेळावे घेण्याचे निर्देश दिलेत. बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी संजय दैने, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, लीड बँक मॅनेजर बिरेंद्रकुमार, जिल्हा उपनिबंधक वालदे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.