वर्धा जिल्ह्यात बिबट्याच्या बछड्याची मातेपासून ताटातूट; उपचारानंतर सोडणार जंगलात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 05:22 PM2018-05-26T17:22:38+5:302018-05-26T17:22:51+5:30
वर्धा जिल्ह्यातील आकोलीच्या हिंगणी वनपरिक्षेत्रात असलेल्या मदनी बिटात आज दुपारी एक बिबट्याचा बछडा आपल्या मातेपासून दुरावला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: वर्धा जिल्ह्यातील आकोलीच्या हिंगणी वनपरिक्षेत्रात असलेल्या मदनी बिटात आज दुपारी एक बिबट्याचा बछडा आपल्या मातेपासून दुरावला. त्याला सध्या पीपल्स फॉर अॅनिमल्सच्या कार्यकर्त्यांच्या सुपूर्द करण्यात आले असून, या बछड्याच्या पायाला झालेल्या जखमेवर उपचार करून त्याला पुन्हा जंगलात सोडण्यात येणार आहे.
हिंगणी वनपरिक्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या शंकररराव दिघडे यांच्या उसाच्या शेतात या बछड्याची आई व अजून एक बछडा निघून गेले आहेत. या भागात काही युवक मासेमारी करण्यासाठी धरणाच्या दिशेने जात असताना त्यांंना धुऱ्यावर बसलेली मादी बिबट व तिचे दोन बछडे दिसले. त्यांनी गावकऱ्यांना ही माहिती कळवताच, शेकडो गावकरी तेथे गोळा झाले. त्यांच्या आवाजाने ही मादी व तिचे दोन बछडे गोंधळून जाऊन उसाच्या शेतात शिरण्यासाठी निघाले. तीत एक बछडा त्याच्या पायाला जखम असल्याने जवळच्या झाडीत दडला. तर मादी बिबट व दुसरा बछडा उसाच्या शेतात शिरले.
झाडीत शिरलेल्या बछड्याला पहायला गावकऱ्यांनी एकच गर्दी केली. यावेळी हिंगणी वनपरिक्षेत्राचे अधिकारी पी.एस. पाडे यांनी जमावाला पांगवले. या बछड्याची तपासणी केली असता त्याच्या पायाला जखम झाल्याचे आढळून आले. त्याला उपचारासाठी पीपल्स फॉर अॅनिमल्सच्या सुपूर्द केले असून दोन दिवस त्याच्यावर उपचार केले जातील. त्यानंतर त्याला त्याच्या मातेजवळ सोडले जाईल.
मादी बिबटचा तात्काळ प्रतिसाद
गावकऱ्यांना आपल्या भोवती गोळा झालेले पाहून हा बछडा जेव्हा जेव्हा डरकाळी फोडायचा तेव्हा तेव्हा जवळपासच दडलेली त्याची आई त्याला प्रत्युत्तर देत होती.