पालिकेच्या स्वच्छता निविदेकडे कंत्राटदारांची पाठ
By admin | Published: May 27, 2017 12:32 AM2017-05-27T00:32:12+5:302017-05-27T00:32:12+5:30
पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले, गटारांची पालिका प्रशासनाकडून स्वच्छता करण्यात येते.
सफाई कर्मचाऱ्यांवर बोझा : सात मोठ्या नाल्यांच्या सफाईला सुरूवात
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले, गटारांची पालिका प्रशासनाकडून स्वच्छता करण्यात येते. यावर्षीच्या कामाकरिता पालिकेने नियोजन केले असून या कामाचे कंत्राट देण्यात येते. पालिकेच्या वतीने निविदा काढण्यात आली तरी कंत्राट घेण्यासाठी अद्याप कंत्राटदारांनी रूची दर्शविलेली नसल्याची माहिती आहे. पालिकेच्या कारभाराला कंटाळून कंत्राटदारांनी निविदेकडे पाठ तर फिरविली नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पावसाळ्यापुर्वीच्या नाले व गटार सफाई कामांना २२ मे पासून प्रारंभ करण्यात आला. यात सुरुवातीला मोठ्या नाल्यांची सफाई करण्यात येत आहे. या कामाचा भार सध्यस्थितीत सफाई कर्मचाऱ्यांवर आहे. कंत्राटदार निश्चित झाला नसल्याने पालिकेचे अधिकारी नागरिकांना त्रास होवू नये याकरिता सफाई कामगार व मजुरांच्या माध्यमातून नाल्या सफाईचे काम करून घेत आहे.
शहरात सात मोठे नाले असून ११ मध्यम नाले आहे. सांडपाण्याकरिता असलेल्या शहरातील विविध प्रभागातील नाल्या या गटारांना जोडण्यात आल्या आहे. या मोहिमेत लहान नाल्याची सफाई करण्यात येणार असल्याची माहिती आहे. यामुळे सदर मोहीम राबविताना अतिरिक्त कामगारांची गरज भासणार आहे. याकरिता पालिकेच्यावतीने सदर कामाचे कंत्राट देण्यात येते. मात्र या कामाकरिता अद्याप कंत्राटदाराकडून प्रस्ताव आलाच नसल्याने सदर काम संथगतीने सुरू आहे.
शहरांतर्गत स्वच्छतेच्या कामांनाही प्रारंभ
या मोहिमेत गटारांचे खोलीकरण करून त्यातील गाळ व कचरा उपसण्यासाठी जेसीबी व पोकलँडचा वापर करण्यात येणार आहे. कचऱ्याची ने-आण करण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. यंदा कंत्राटदार नसल्याने पालिकेच्या यंत्रणेलाच संपूर्ण तयारी करावी लागत आहे. शहरातील ७ मोठ्या नाल्यांचे सफाई करण्यासाठी मजुरांची तरतूद करण्यात आली असून सफाई कामगारावर याचा बोझा येत आहे. पालिकेच्या आढावा बैठकीत पावसाळ्यापूर्वी नियोजनावर चर्चा झाली. यात कंत्राट देण्याचे निश्चित करण्यात आले; मात्र कंत्राटदारांनी याकडे पाठ का फिरविली यावर प्रश्नचिन्हच आहे.