नाफेडच्या तूर खरेदीकडे शेतकऱ्यांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 11:47 PM2018-02-17T23:47:43+5:302018-02-17T23:48:07+5:30
गत वर्षी नाफेडच्या तूर खरेदीचा सावळागोंधळ पाहता यावर्षी शेतकऱ्यांनी नाफेडच्या तूर खरेदी केंद्राकडे पूर्णत: पाठ फिरविल्याचे दिसत आहे. यात नाफेडने तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांसाठी ११ क्विंटलची अट ठेवल्याने शेतकऱ्यांची पंचाईत झाली आहे.
सुरेंद्र डाफ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : गत वर्षी नाफेडच्या तूर खरेदीचा सावळागोंधळ पाहता यावर्षी शेतकऱ्यांनी नाफेडच्या तूर खरेदी केंद्राकडे पूर्णत: पाठ फिरविल्याचे दिसत आहे. यात नाफेडने तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांसाठी ११ क्विंटलची अट ठेवल्याने शेतकऱ्यांची पंचाईत झाली आहे. यामुळे आतापर्यंत ६५५ क्विंटल तुरीची आवक झाली असल्याचे दिसून आले आहे.
या अडचणीमुळे यंदा उर्वरित तूर कुणाला विकावी या पेचात शेतकरी सापडले आहे. शासनाने आता शेतकºयांची निम्मी तूर खरेदी करण्याची अट शिथील करण्याची घोषणा केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण तूर खरेदी करण्यासंबंधीचे आदेश कृषी उत्पन्न बाजार समित्यांना प्राप्त झाले आहे.
तूर खरेदीसाठी निम्या क्षेत्राची अट शासनाने शिथील केली आहे. यात शेतकऱ्यांच्या शेतातील सर्व उत्पादित तूर खरेदी करण्याचे आदेश देण्यात आले; परंतु अद्यापही त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात न आल्याने शेतकरी आपल्या शेतातील तूर पीक खाजगी व्यापाऱ्यांना कमी भावाने विकत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी नाफेडच्या तूर खरेदीची ही योजना पूर्णत: फसली असल्याचे सध्या दिसत आहे. शासकीय तूर खरेदी ही कृषी उत्पादनानुसार करण्यात यावी, असे आदेश होते. यात नव्याने सुधारणा करून शेतकऱ्यांची सर्व तूर खरेदी करण्याचे आदेश दिले.
आर्वीत नाफेडच्या तूर खरेदीकडे पाठ फिरविली आहे. आर्वीत ५ फेब्रुवारीपासून नाफेडच्या तूर खरेदीचा प्रारंभ झाला. आर्वीत नाफेडकडे आतापर्यंत १३०० शेतकऱ्यांनी तूर विकली आहे. आतापर्यंत फक्त ६४ शेतकऱ्यांची ६५५.८९ किलो तूर नाफेडने खरेदी केली आहे. याउलट खाजगी व्यापाऱ्यांनी आतापर्यंत ४,६५१ क्विंटल तूर खरेदी केली आहे. यावर्षी तूर पिकावर अज्ञात रोगाचे आक्रमण झाल्याने अपेक्षित तूर पीक शेतकऱ्यांच्या पदरी पडले नाही.
दरवाढीच्या अपेक्षेत तूर घरीच
यंदा तुरीचे उत्पादन कमी झाल्याने चांगले दर मिळतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यांची तूर हमीभावात देण्यापेक्षा घरीच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यात येत्या दिवसात तुरीला दर मिळतील अथवा असलेल्या दरातही घट होते याकडे तर उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
शेतकऱ्यांच्या तूर खरेदीसाठी जाचक अट पाहता पूर्ण क्षेत्र गृहित धरणार असल्याची अंमलबजावणी करण्यात आली; परंतु अद्याप तसेच लेखी आदेश आले नाही. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी नाफेडला तूर खरेदीचा फारसा प्रतिसाद नाही.
- विनोद कोटेवार
प्रभारी सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, आर्वी.