अधिकारी कर्मचाऱ्यांना जलसंधारणाचे धडे
By admin | Published: December 30, 2014 11:39 PM2014-12-30T23:39:52+5:302014-12-30T23:39:52+5:30
सर्वत्र जाणवत असलेला कोरड्या दुष्काळावर मात करण्याकरिता राज्य शासनाच्यावतीने जलयुक्त शिवार अभियाने सुरू केले आहे. या अभियानात सहभागी होणार असलेल्या जिल्ह्यातील कृषी विभाग,
वर्धा : सर्वत्र जाणवत असलेला कोरड्या दुष्काळावर मात करण्याकरिता राज्य शासनाच्यावतीने जलयुक्त शिवार अभियाने सुरू केले आहे. या अभियानात सहभागी होणार असलेल्या जिल्ह्यातील कृषी विभाग, वनविभाग व जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मंगळवारी माहिती देण्यात आली. शिवाय त्यांना करावयाचे कार्यही सांगण्यात आले.
वर्धा जिल्हा कोरडवाहू शेतीचा जिल्हा असून यात ओलिताचे क्षेत्र वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यात शासनाने दिलेल्या निर्देशानुसार कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यात पहिले प्रत्येकच विभागाच्यावतीने पाणी अडवून ते जिरविण्यात येत होते. आता मात्र तसे होणार नाही. जिल्ह्यात बंधारे तयार करण्याकरिता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेत एक समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीकडे प्रस्ताव सादर करून त्याला मंजुरी मिळवून बंधारा तयार करण्यात येणार आहे. या बाबत आजची कार्यशाळा आयोजित होती. या शाळेला जिल्हा प्रशासनाचे अधिकारी व कर्मवारी उपस्थित होते.
विकास भवन येथे झालेल्या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी एन.नवीन सोना होते. अतिथी म्हणून जि.प.चे मुख्यकार्यपालन अधिकारी उदय चौधरी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे आर.टी. वाहने, जि.प. लघु पाटबंधारे विभागाचे सहारे, उपविभागीस अधिकारी वैभव नावाडकर, विलास ठाकरे, उपअभियंता सुनील राहाणे, वरिष्ठ भू वैज्ञानिक नितीन महाजन यांच्यासह जिल्ह्यातील तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी विविध विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)