दिव्यांगांना दाखला तालुकास्थळीच द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 10:31 PM2019-07-16T22:31:04+5:302019-07-16T22:31:15+5:30
सेलू तालुक्यातील दिव्यांग बांधवांना शासकीय योजनेचा लाभ मिळण्यासाठी दिव्यांग प्रमाण पत्र प्राप्त करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा येथे आठवड्यातून एक दिवस यावे लागते. शिवाय तेथेच त्यांना विविध तपासणी करून घ्यावी लागते.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरधरण : सेलू तालुक्यातील दिव्यांग बांधवांना शासकीय योजनेचा लाभ मिळण्यासाठी दिव्यांग प्रमाण पत्र प्राप्त करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा येथे आठवड्यातून एक दिवस यावे लागते. शिवाय तेथेच त्यांना विविध तपासणी करून घ्यावी लागते. जिल्ह्यातील विविध गावातून दिव्यांगांना जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धेत येण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यांची समस्या लक्षात घेता दिव्यांग बांधवांना तालुक्याच्या स्थळीच सदर प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी युवा संघर्ष संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. तसे निवेदन जिल्हा शल्य चिकित्सकांना सादर करण्यात आले आहे.
सेलू तालुक्याच्या ठिकाणाहून वर्धा येथे जाण्यासाठी दिव्यांग बांधवांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तिथे जाऊन ही काम झाले तर ठीक नाही तर रिकाम्या हाती परतावे लागते. या त्रासाला कंटाळून अनेक दिव्यांग या प्रमाणपत्र पासून अजूनही वंचित आहे. त्यामुळे शासनाकडून मिळणारे मानधनही अनेक दिव्यांगांना मिळत नाही. परिणामी सेलू येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणी करून प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी युवा संघर्ष संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. सदर मागणीचे निवेदन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांना सादर करण्यात आले. निवेदन देताना शुभम लुंगे, सुनील घंगारे, दीपक घुमडे, नितीन गुजर, आरिफ झिरिया, किशोर बावणे, गुड्डू गुजर, समीर डाखोळे, प्रदीप धानकुटे, कुणाल चोरे, सुरज खोडके, मयुर चोरे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.