अंधाराचा नाश करू या, प्रकाशपूत्र होऊ चला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 10:12 PM2018-03-25T22:12:03+5:302018-03-25T22:12:03+5:30
आजच्या काळात गरीब, श्रीमंत, दुर्बल, सबल, शोषक शोषित अशी दरी वाढत आहे. अजूनही दारिद्र्याने पिचलेला समाज पीडित जीवन जगत आहे. अशावेळी अंधाराचा नाश करण्यासाठी प्रकाशपूत्र होऊन उजेड निर्माण करू असा संकल्प कवी संमेलनातून अनेक कवींनी केला.
आॅनलाईन लोकमत
वर्धा : आजच्या काळात गरीब, श्रीमंत, दुर्बल, सबल, शोषक शोषित अशी दरी वाढत आहे. अजूनही दारिद्र्याने पिचलेला समाज पीडित जीवन जगत आहे. अशावेळी अंधाराचा नाश करण्यासाठी प्रकाशपूत्र होऊन उजेड निर्माण करू असा संकल्प कवी संमेलनातून अनेक कवींनी केला. राष्ट्रीय कवी कला मंच व रंगलोक कला व्हिजन यांच्या संयुक्त विद्यमाने कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. प्रमोद नारायणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून वंदना कोल्हे, शेखर सोळंके, प्रभाकर पाटील, गंगाधर पाटील, प्रभाकर उघडे उपस्थित होते. भास्कर नेवारे यांनी माझा शेतकरी राजाचं टपोर सपनं, कणसाला दाने यावे भरारून, अशी शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारीत कविता सादर केली. कवी प्रशांत ढोले यांनी मित्रा, स्वत:च अस्तित्व निर्माण कर, तिमिराला दूर लोटून प्रकाशपर्वाला जवळ कर, अशी प्रकाशपर्वाची कविता सादर केली.
प्रमोद नारायणे यांनी समरामधले सैन्य अजूनही दमले नाही, अजूनही माझे वादळ शमले नाही. ही गझल सादर केली. जयश्री कोटगीरवार यांनी काय भरवसा या कवितेद्वारे मानसाने मनाला मोठे करून आकाश व्यापून टाकावे अशी भावना व्यक्त केली. मोहन चिचपाने यांनी आजच्या व पूर्वीच्या काळाचे वर्णन कवितेतून केले. पूर्वीचा काळ बाबा खरंच होता चांगला, साधे घर साधी माणसे, कुठे होता बंगला असा प्रश्नही त्यांनी कविततेतून विचारला. संदीप धावडे यांनी वडाच्या पाकळ्या, उसवते टाके, वेदनेच्या धाके, चिडीचूप हा प्रेमविषयक अभंग सादर करून रसिकांची दाद मिळविली.
डॉ. विद्या कळसाईत यांनी आम्ही स्वातंत्र्य झालो, पण स्वातंत्र्यांचा अर्थ आम्ही समजू शकलो काय? असा रोखठोक सवाल करणारी कविता सादर केली. संजय भगत यांनी दिव्याची जळते वात, तिचं थोर पावित्र्य, सावित्रीचं नाव मोठं शिक्षण क्षेत्र केलं पवित्र अशी कविता सादर करून रसिकांची दाद मिळवली. रमेश खुरगे यांनी जंजीर ही कविता सादर केली. अरविंद भोयर यांनी आम्हा ना म्हातारे, आम्ही आहोत ज्येष्ठ, उचलू आम्ही जबाबदारी, आम्ही नाही वेस्ट असे तरुणांना ठणकावणारी कविता सादर केली. स्रेहल हुकूम यांनी सावित्रीच्या लेकीला जरा साभाळून चालण्याची सूचना कवितेतून दिली. प्रा. जनार्दन ददगाळे यांनी कवीबद्दलची कविता सादर करून कवीचे समाजप्रबोधनातील महत्त्व अधोरेखित केले. प्रभाकर पाटील यांनी माणसं जोडावीत कशी ही कविता तर गंगाधर पाटील यांनी गझल सादर केली. वंदना कोल्हे, सुनील साधव, विजयकुमार यांनीही याप्रसंगी कविता सादर केल्या. विठ्ठल देवगडकर व शुभांगी सोळंके या कलाकारांनी सुरेख आवाजात गीत सादर केले.
प्रा. प्रमोद नारायणे यांनी अध्यक्षीय भाषणातून कवितेचे महत्त्व सांगितले. समाज परिवर्तन करण्याची ताकद कवितेत असून अनेक चळवळी कवितेने क्रांतीकारक कार्य केल्याचेही ते म्हणाले. प्रारंभी गिरीष उपाध्ये यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रा. शेख हाशम, स्मिता देवगडकर, गुणवंत डकरे उपस्थित होते. संचालन रमेश खुरगे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सुनील सावध यांनी मानले.