महात्मा गांधींची ग्रामोद्योगाची संकल्पना प्रत्यक्षात आणू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 05:00 AM2020-07-25T05:00:00+5:302020-07-25T05:01:16+5:30
पालकमंत्र्यांनी विविध संस्थांकडून जयंती दिनानिमित्त आयोजित करावयाच्या नावीन्यपूर्ण संकल्पनांची माहिती जाणून घेतली. याशिवाय महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, महिलांसोबत काम करणाऱ्या सामाजिक संस्था यांचा मगन संग्रहालयासोबत समन्वय करून एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचार सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी आणि त्यांच्या विचारावर आधारित ग्रामोद्योग उभे करण्यासाठी त्यांच्या जयंतीनिमित्त एमगिरीने विकसित केलेले तंत्रज्ञान आयटीआय आणि तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करावी, या विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानासोबत ग्रामोद्योग कसे उभारता येतील, याची प्रेरणा देण्याचे प्रयत्न करून महात्मा गांधींची ग्रामोद्योगाची संकल्पना प्रत्यक्षात आणू, असे प्रतिपादन दुग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी करण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी विविध सूचना दिल्यात. बैठकीला आमदार रणजित कांबळे, अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे, सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष टी.आर. एन. प्रभू, डॉ. बी. एस. गर्ग, बजाज संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी विविध संस्थांकडून जयंती दिनानिमित्त आयोजित करावयाच्या नावीन्यपूर्ण संकल्पनांची माहिती जाणून घेतली. याशिवाय महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, महिलांसोबत काम करणाऱ्या सामाजिक संस्था यांचा मगन संग्रहालयासोबत समन्वय करून एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाने गांधींच्या विचारावर आंतरराष्ट्रीय क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवर व्यक्तींचे संमेलन आयोजित करण्यासंदर्भात सांगितले. गांधी विचारावर काम करणाऱ्या संस्थांनी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी सहकार्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. महात्मा गांधींचे विचार आणि त्यांचे ग्रामोद्योगाची संकल्पना सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपल्या संकल्पना चांगल्या पद्धतीने राबविण्यासाठी सर्व मिळून काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. सर्व संस्थांनी शासन, प्रशासनाला आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची हमी दिली. यावेळी मुकुंद मस्के, सर्व सेवा संघाचे प्रशांत गुजर, जमनालाल बजाज फाउंडेशनचे जीवन कुलबांते, एमगिरीचे डॉ. व्यंकट राव, नई तालीमचे शिवचरणसिंग ठाकूर, ग्रामोपयोगी विज्ञान केंद्राचे सोहम् पंड्या, बजाजवाडीचे संजय कुमार, कस्तुरबा हेल्थ सोसायटीचे बी. एस. गर्ग, राष्ट्रभाषा प्रचार समितीचे डॉ. हेमचंद्र वैद्य, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे डॉ. कादर नवाज खान, प्रा. मनोज कुमार उपस्थित होते.
दिडशे उद्योगांची होणार उभारणी
ग्रामोपयोगी विज्ञान केंद्र आणि सर्व सेवा संघाच्या वतीने दीडशे गावांमध्ये दीडशे युवकांसाठी दीडशे उद्योग सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले. हे उद्योग स्वदेशीला प्रेरणा देण्यासाठी आणि स्वदेशी मालाचा जास्तीत जास्त वापर होण्यासाठी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाशी समन्वय साधून युवकांना त्या पद्धतीचे प्रशिक्षण देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात यावे, असे सांगितले.