आपट्यांची झाडं वाचवू या!
By admin | Published: October 3, 2014 02:05 AM2014-10-03T02:05:41+5:302014-10-03T02:05:41+5:30
संपूर्ण भारतात दसरा हा सण उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्रात या सणाला आपट्याची पानं सोनं म्हणून एकमेकांना देवून शुभेच्छा देण्याची प्रथा आहे.
पराग मगर वर्धा
संपूर्ण भारतात दसरा हा सण उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्रात या सणाला आपट्याची पानं सोनं म्हणून एकमेकांना देवून शुभेच्छा देण्याची प्रथा आहे. यामुळे आपसातील संबंध वृद्धींगत होतात. या प्रथेला पौराणिक महत्त्व असले तरी काळाच्या ओघात सोन्याचा मान असलेली ही सोन्यासारखी आपट्याची झाडच नामशेष होत आहेत. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने आपट्याची झाडे लावून दसरा हा सण साजरा करण्याची गरज व्यक्त होत आहे.
भारताच्या इतिहासात सर्वाधिक घटना या दसऱ्याला घडल्या आहेत. दहा तोंड असलेल्या रावणाला रामाने हरविल्याने हा सण दशहरा व काळाच्या ओघात दसरा म्हणून साजरा होतो. प्रत्येक राज्यात हा सण साजरा करण्याच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत. त्याला स्वतंत्र पारंपरिक वारसा आहे. या दिवशी बहुतेक ठिकाणी रावणदहन केले जाते. आपट्याच्या झाडावर सोन्याचा वर्षाव झाला अशा कथेप्रमाणे महाराष्ट्रात आपट्याच्या झाडाची पानं एकमेकांना शुभेच्छा रूपात देण्याची प्रथा सुरू झाली. याला सोनं लुटणे असे म्हणतात. काळाच्या ओघात सोनं लुटणे या प्रथेने झाडांना मात्र उघडं बोडखं करून टाकलं. आपट्याची झाडं ही विशेषकरून जंगलात वाढतात. कडूलिंब, वड, पिंपळ या झाडसारखे ते सर्वत्र आढळत नाहीत, किंवा महाकाय वाढत नाही. दसयाच्या दिवशी या झाडाच्या फांद्या मोठ्या प्रमाणात तोडल्या जातात. जिल्ह्याचा विचार करता या काही वर्षात ही झाडे वृद्धत्व आल्यासारखी झाली आहेत.पण झाडे किती प्रमाणात लावल्या गेली किंवा ही झाडे वृद्धीगंत व्हावी यासाठी कुठलीही उपाययोजना केल्याचे दिसत नाही. त्यामुळे असेच सुरू राहिल्याने पुढच्या पिढीला सोनं लुटण्यासाठी ही झाडच उरतील की नाही ही भीती पर्यावरणपे्रमी व्यक्त करीत आहे. सोनं लुटण्यासाठी आधी ही झाडे मोठ्या प्रमाणात लावण्याची गरज आहे.