फायनान्सच्या कर्जातून मुक्त करा; महिलांची मागणी
By Admin | Published: December 30, 2016 12:41 AM2016-12-30T00:41:59+5:302016-12-30T00:41:59+5:30
काळ्या पैशातून बिनदिक्कत कर्जवाटप करून आर्थिकदृष्ट्या कमकुवत शहरी व ग्रामीण भागातील गरीब
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : कार्यवाहीची मागणी
वर्धा : काळ्या पैशातून बिनदिक्कत कर्जवाटप करून आर्थिकदृष्ट्या कमकुवत शहरी व ग्रामीण भागातील गरीब महिलांचे आर्थिक शोषण करणाऱ्या खासगी मायक्रो फायनान्स कंपनीच्या संचालक मंडळातील प्रत्येक सदस्यावर गुन्हा दाखल करावा, वसुली प्रतिनिधींवर फौजदारी कारवाई करावी, या मागणीसाठी बुधवारी महिलांनी आंदोलन केले. झाँशी राणी पुतळ्याजवळ महात्मा कर्जमुक्ती आंदोलन समितीच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले.
राज्यातील संपूर्ण महिलांना विनाअट, विनाशर्त कर्जमुक्त झाल्याची घोषणा शासनाने त्वरित करावी. अन्यथा मुंबई येथे १७ जानेवारी रोजी आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी दिलेल्या निवेदनातून देण्यात आला. ग्रामीण भागातील महिलांच्या गळ्याभोवती कर्जाचा फास आवळला आहे. यामुळे महिला मानसिकदृष्ट्या खचल्या असून आर्थिक विवंचनेत आहेत. कर्जाचे हफ्ते भरण्यासाठी महिलांकडे पैसे नसल्याने आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. मायक्रो फायनान्स कंपन्यांनी कर्ज दिल्यानंतर २२ ते ३६ टक्के व्याज आकारले जात आहे. परिणामी, महिलांची मोठ्या प्रमाणात लूट केली जात आहे. कुठल्याही बँक वा सोसायटीकडून जेवढे व्याज आकारले जात नाही, तेवढे व्याज मायक्रो फायनान्स कंपन्या आकारत आहेत. महिलांकडून आधार, मतदान कार्ड तसेच फोटो घेऊन कर्ज न भरल्यास तुमच्या राहत्या घरावर ताबा करण्यात येईल. तुमच्या मुलांना शासकीय सेवेत लागू देणार नाही. नोकरी मिळू देणार नाही, अशा धमक्या दिल्या जात आहे. यामुळे सर्व गैरव्यवहार व गैरप्रकाराची विशेष समिती नेमून चौकशी करावी, संपूर्ण मायक्रो फायनान्स कंपन्यांना महाराष्ट्रातून हद्दपार करण्यात यावे, अशी मागणी यावेळी महिलांकडून करण्यात आली.
यावेळी महिलांनी झाँशी राणी पुतळ्यासमोर पोस्ट आॅफिस चौकात आंदोलन केले. आंदोलनात संजय आठवले, सादिक ठेकेदार, प्रवीण हावरे, शबाना खान, अजीम करीम आदींसह मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग होता.(स्थानिक प्रतिनिधी)