वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी २४ तासात परवाना द्या
By admin | Published: December 3, 2015 02:29 AM2015-12-03T02:29:10+5:302015-12-03T02:29:10+5:30
वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी शेतकऱ्यांना २४ तासांत परवाना द्या, असा निर्णय शासनाने घेतला; पण त्यावर अंमल होताना दिसत नाही.
मुख्य वनसंरक्षकांचे निर्देश : अहवाल पाठविण्याच्याही दिल्या सूचना
वर्धा : वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी शेतकऱ्यांना २४ तासांत परवाना द्या, असा निर्णय शासनाने घेतला; पण त्यावर अंमल होताना दिसत नाही. यामुळे थेट मुख्य वन संरक्षकांनीच शेतकऱ्यांना २४ तासांच्या आत परवाने देण्याचे निर्देश दिलेत. शिवाय तक्रार करताच पोच पावती घ्यावी, अशा सूचना शेतकऱ्यांना दिल्यात.
रानडुक्कर वा रोही या वन्य प्राण्यांपासून शेतपिकांचे नुकसान होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी संबंधित वनक्षेत्रपाल यांच्या अर्ज देत पोचपावती प्राप्त करावी. उपरोक्त तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित वनक्षेत्रपाल यांनी शहानिशा करून रानडुक्कर वा रोही पारध करण्याबाबत परवाना २४ तासांच्या आत निर्गमित करावा. २४ तासाच्या आत परवाना दिला नाही वा नाकारला नाही तर अर्जदाराला परवाना देण्यात आला आहे, असे गृहित धरून पारध करण्याची मुभा राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पारध करण्याच्या परवानगीत लागणारा व्यवहारिक कालावधी व क्षेत्राबाबतचा तपशिल नमूद करावा. परवानाधारकाने त्याचे काटेकोरपणे पालन करावे. प्रत्येक महिन्यात दिलेले परवाने व त्यानुसार पारध केलेल्या रानडुक्कर, रोही यांची संख्या, विल्हेवाटीचा मासिक अहवाल वनक्षेत्रपालांनी संबंधित उपवन संरक्षकाकडे सादर करावा. उपवन संरक्षक व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावर पारध झालेल्या वन्य प्राण्यांबाबत प्रत्येक महिन्यात आढावा घेत प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांना अहवाल सादर करावा. प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी झालेल्या कार्यवाहीचा आढावा घेत गरजेनुसार शासनास अहवाल पाठवावा. अडचणी आल्यास प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सूचना द्याव्या.
नुकसान पीडित शेतकऱ्यांकडे शस्त्र परवाना नसल्याने रोही व रानडुक्करांची पारध शक्य होत नाही. यासाठी नागपूर जिल्हा रायफल असो.चे नेमबाज चंद्रकांत देशमुख, आरिफ ईकबाल व सहकारी यांची मदत घेता येणार असल्याचेही मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) नागपूर यांनी स्पष्ट केले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
राष्ट्रीय उद्याने, उभायारण्य, व्याघ्र प्रकल्प, संवर्धन राखीव क्षेत्रात कुठल्याही परिस्थितीत पारध करण्याची परवानगी देता येत नाही. अभयारण्य, राष्ट्रीय उद्यानाच्या सिमेपासून पाच किमी सभोवतालच्या क्षेत्रात या तरतुदीचा वापर करताना अत्याधिक काळजी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.