शेतीवाहीसाठी डोंग्यातून जीवघेणा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 05:00 AM2020-07-03T05:00:00+5:302020-07-03T05:00:08+5:30
वीस वर्षांपूर्वी वाहितपूर-मोर्चापूर येथील नागरिक पवनार येथे बाजारहाट करण्याकरिता येत असत. वर्ध्याला जायचे असेल तर पवनारपर्यंत पायी किंवा सायकलने येऊन मग तेथून एस.टी. किंवा इतर वाहनाने वर्ध्याला जायचे. मात्र, वर्धा एमआयडीसीला पाणीपुरवठा करण्यासाठी बंधारा बांधला गेला व परिस्थिती बदलली. नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने नदीतून आवागमनाचा मार्ग बंद झाला.
श्रीकांत तोटे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनार : तीनशे मीटर नदीपात्र ओलांडून शेतीवाहीसाठी येथील शेतकऱ्यांचा कित्येक वर्षांपासून जीवघेणा प्रवास सुरू आहे. मात्र, प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जात नसून अनास्था कायम आहे.
वीस वर्षांपूर्वी वाहितपूर-मोर्चापूर येथील नागरिक पवनार येथे बाजारहाट करण्याकरिता येत असत. वर्ध्याला जायचे असेल तर पवनारपर्यंत पायी किंवा सायकलने येऊन मग तेथून एस.टी. किंवा इतर वाहनाने वर्ध्याला जायचे. मात्र, वर्धा एमआयडीसीला पाणीपुरवठा करण्यासाठी बंधारा बांधला गेला व परिस्थिती बदलली. नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने नदीतून आवागमनाचा मार्ग बंद झाला. पवनारला येण्यास कान्हापूरमार्गे तीन किलोमीटरचा फेरा वाढल्याने त्यांनी सेलू येथे जाणे पसंत केले. मात्र, पवनार येथील अनेक शेतकऱ्यांची शेती नदीच्या पैलतीरावर आहे. त्यांना शेतीवर जाण्यासाठी नदी ही ओलांडावीच लागते, शेतमाल, शेतमजूर यांचीसुद्धा ने-आण करावी लागते. एम.आय.डी.सीच्या बंधाºयावरून छोटा पूल आहे. मात्र, त्या पुलावरून गेल्यास तीन-चार किलोमीटरचा फेरा पडतो. यात बराच वेळ खर्ची होत असल्याने या तिरावरून त्या तिरावर जाण्यासाठी डोंग्याचा वापर केला जातो. साधारण ३०० मीटर नदीपात्र हे त्या डोंग्यातून पार केले जाते. ज्या मार्गाने डोंगा जातो, तेथे कमीत कमी पंधरा फूट पाण्याची पातळी असते. सकाळच्या वेळेस शेतात जाण्याची शेतमालकासह शेतमजुरांची लगबग असते. त्यामुळे क्षतमेपेक्षा जास्त प्रवासी नावाड्याने मनाई केल्यावर सुद्धा बसतात. प्रवास करणाऱ्यांसाठी कुठल्याही लाईफ जॅकेट्सची व्यवस्था नसते. पाणी अडविल्यामुळे नदीची पातळी वर्षभर कायम असते, त्यामुळे नेहमीकरीताच डोंग्याचा वापर केला जातो. त्यामुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. जो डोंगा हाकलतो, तो नाममात्र शुल्क घेत असल्याने सोयी-सुविधा देऊ शकत नाही. सोयी द्यायच्या म्हटले तर आकारलेले जास्तीचे शुल्क शेतमालक किंवा शेतमजुराला परवडणारे नाही. प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
पुलाची निर्मिती कासवगतीने
ही अडचण दूर व्हावी म्हणून अनेक वर्षापासून असलेली पुलाची मागणी आमदार पंकज भोयर यांच्या प्रयत्नातून तत्कालीन सरकारने मंजूर केली. दोन वर्षांपासून या पुलाचे काम कासवगतीने सुरू आहे. हीच गती कायम राहिल्यास अजून दोन वर्षे पुलाचे काम पूर्ण होण्याची चिन्हे दिसत नाही. पुलाचे काम लवकर करावे किंवा डोंग्याने जाण्यासाठी सोयी-सुविधा द्याव्यात, अशी मागणी होत आहे.