ऑनलाइन रेटिंगच्या नावाने १.२२ लाख रुपयांना चुना! सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
By चैतन्य जोशी | Published: January 17, 2024 05:46 PM2024-01-17T17:46:30+5:302024-01-17T17:46:51+5:30
हॉटेलला ऑनलाईन रेटींग देण्याच्या नावे व्यक्तीकडून तब्बल २ लाख ९० हजारांची रक्कम गुगल पे तसेच अॅपद्वारे विविध बँक खात्यावर टाकण्यास भाग पाडले.
वर्धा : हॉटेलला ऑनलाईन रेटींग देण्याच्या नावे व्यक्तीकडून तब्बल २ लाख ९० हजारांची रक्कम गुगल पे तसेच अॅपद्वारे विविध बँक खात्यावर टाकण्यास भाग पाडले. यापैकी १ लाख ६७ हजार ४८ आणि १००० रुपये ही खात्यावर होल्ड करण्यात आली असून व्यक्तीची १ लाख २२ हजार ६३२ रुपयांनी ऑनलाईन आर्थिक फसवणूक केली.
याप्रकरणी व्यक्तीने सायबर पोलिस ठाण्यात १६ रोजी तक्रार दाखल केली असून पोलिसांनी सायबर भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. प्राप्त माहितीनुसार, विवेक दिवाकर दौड (३४ रा. साईनगर वर्धा) याला १० ते १२ डिसेंबर २०२३ दरम्यान अनोळखी व्यक्तीने मोबाईलवरुन एसएमएस पाठविला. त्यामध्ये हॉटेल व रेस्टॉरेंटला ऑनलाईन रेटींग देण्याचा जॉबबाबत माहिती व टेलीग्राम लिंक पाठविली होती. विवेक दौड याला पार्ट टाईम जॉब करण्याची इच्छा असल्याने त्याने भामट्याने पाठविलेली लिंक ओपन करुन कॉईन स्वीच या टेलीग्राम चॅनलवर भेट दिली. त्या चॅनलला रेटींग देण्याचे टास्क विवेकने पूर्ण केल्याने त्यास १ हजार रुपये आणि १, ५०० रुपये विवेकच्या खात्यात जमा झाले.
त्यानंतर भामट्याने विवेक याला तुम्ही गुंतवणूक केल्यास चांगली रक्कम मिळेल असे भासवून त्याच्याकडून २ लाख ९० हजार ६८० रुपये आरोपीने गुगल पे आणि एका अॅपद्वारे विविध बँक खात्यावर स्वीकारली. या रकमेपैकी १ लाख ६७ हजार ४८ रुपये आणि १ हजार रुपये खात्यांवर होल्ड झाली मात्र, १ लाख २२ हजार ६३२ रुपयांची रक्कम आरोपी भामट्याने काढून घेत विवेक दौड याची आर्थिक फसवणूक केली. याबाबतची तक्रार त्याने सायबर पोलिस ठाणे गाठून केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तांत्रिक तपासाला सुरुवात केल्याचे सांगितले.