बाजारपेठेत शुकशुकाट, शेतकऱ्यांच्या खरेदी-विक्री व्यवहारांवर मर्यादा
By admin | Published: November 10, 2016 12:54 AM2016-11-10T00:54:41+5:302016-11-10T00:54:41+5:30
या निर्णयाचा सर्वाधिक फटका दैनंदिन व्यवहार आणि बाजारपेठेला बसला. शहरातील बाजारपेठेत सकाळीपासून शुकशुकाट होता.
या निर्णयाचा सर्वाधिक फटका दैनंदिन व्यवहार आणि बाजारपेठेला बसला. शहरातील बाजारपेठेत सकाळीपासून शुकशुकाट होता. कपडा असोसिएशन, किराणा असोसिएशन, कृषी व्यावसायिक संघटना, औषधी विक्रेता संघ आदींच्या वेगवेगळ्या बैठका पार पडल्यात. लहान दुकानदारांनी किरकोळ व्यवहार करावेत, मोठे व्यवहार करू नये. ५००, १००० च्या नोटा स्वीकारल्या जाऊ नये, असे ठरले. यामुळे बाजारपेठेमध्ये ग्राहकांची विशेष रेलचेल दिसून आली नाही. कपडा असोसिएशनद्वारे बुकींगवर वस्तू देण्याचा निर्णय घेण्यात आला. यात ‘नॉमीनल’ २०० ते ३०० रुपये घेऊन कपडा बुक करणे आणि व्यवहार सुरळीत झाल्यानंतर पूर्ण पैसे घेऊन वस्तू देण्याचे ठरले. प्रसंगी ओळखी आणि संबंध असल्यास उधारीवर व्यवहार केले जात असल्याचे पाहावयास मिळाले. असे असले तरी चेक, कार्ड पेमेंट वा इंटरनेट बँकींगद्वारे व्यवहार सुरळीत सुरू होते. सामान्य, गरीब नागरिकांना हे व्यवहार शक्य नसल्याने त्यांचे खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्पच दिसून आले.
सराफा बाजारामध्ये या निर्णयाचा मोठा प्रभाव दिसून आला. शेअर मार्केट घसरले आणि मंगळवारी ३०-३१ हजारांवर असलेले सोने बुधवारी ३४ हजार ५०० रुपयांवर पोहोचले. शिवाय ४० हजार रुपयांपर्यंत सोन्याची विक्री होत असल्याचेही पाहावयास मिळाले. यात अनेक ठिकाणी ५००, १००० रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जातील; पण सोने ४० हजार रुपये तोळे प्रमाणे घ्यावे लागतील, असे व्यवहार झाल्याचेही अनेकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
निवडणुकीच्या काळात नरेंद्र मोदी यांनी जनतेला शब्द दिला होता. ज्या गरीब जनतेने रक्ताचे पाणी करून धन मिळविले, ते धन भ्रष्टाचारी रुपातून जमवून ज्या गलेलठ्ठांनी आपल्या घरात, कानाकोपऱ्यात, जमिनीखाली पुरवून ठेवले, ते बाहेर काढण्यासाठी ५०० व १००० रुपयांच्या नोटा बंद करून आज खऱ्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला दिलेला शब्द पूर्ण केला. त्याबद्दल जनतेत उत्साहाचे वातावरण असून जनता नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देत आहे.
- रामदास तडस, खासदार, वर्धा.