साबरमतीच्या धर्तीवर पवनारात घाट बांधणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 12:40 PM2017-11-01T12:40:26+5:302017-11-01T12:43:13+5:30
आॅनलाईन लोकमत
वर्धा : सेवाग्राम विकास आराखड्यात पवनार व वर्धा शहरातील ही विकास कामांचा समावेश आहे. त्यामुळे या दोन ठिकाणी विकास आराखड्यांतर्गत कामे केले जाणार आहेत. गुजरात राज्यातील साबरमती येथे असलेल्या नदी घाटाच्या धर्तीवरच पवनार येथील धाम नदीच्या घाटाची बांधणी केली जाणार आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात पवनार भागात विकास कामांना गती येणार आहे.
आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी असलेल्या पवनार नगरीच्या विकासासाठी यापुर्वी राज्य सभेच्या सदस्य राहिलेल्या खा. निर्मला देशपांडे यांच्या निधीतून मोठ्या प्रमाणावर विकास कामे करण्यात आले. त्यानंतर आता सेवाग्राम विकास आराखड्यात पवनार व वर्धा हे दोन गावेही जोडण्यात आले आहे. त्यामुळे विनोबांच्या कर्मभूमीत पुन्हा नव्याने विकास कामांची भर पडणार आहे. सेवाग्राम वर्धा आणि पवनार विभागातील सांस्कृतिक आणि ऐतिहासीक स्थळांचा विकास, रस्त्यालगतच्या इमारती व ऐतिहासीक वास्तूंचे संवर्धन, रस्त्यावर सावलीसाठी आॅनिंग व बसण्यासाठी बाक जमिनीवर वेगळ्या लाद्या बसविणे आदी कामांकरिता १ कोटी ६० लाख १०० रूपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
याशिवाय ऐतिहासीक वास्तूंना जोडणारा हेरिट्रेज ट्रेल पादचारी मार्ग बनविणे व त्याचे सुशोभिकरण करणे या कामासाठी १ कोटी ५० लाख रूपये खर्च केले जाणार आहे. पवनार गावातील दिल्लीगेट व परिसराचा वारसा संवर्धन करण्यासाठी १ कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहे. रस्त्यालगत वृक्षारोपण, माहितीफलक आदींकरिताही निधी खर्च केला जाणार आहे. याशिवाय पवनार व परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पादचारी मार्ग तयार करण्यात येणार असून धाम नदी काठाचा विकास, नूतनीकरण व सुशोभिकरण, नदीच्या दोन्ही बाजूस व पवनार आश्रमसमोर ते समाधीपर्यंत चालण्यासाठी पादचारी रस्ता व नदीकाठाची स्वच्छता व साफसफाई, बंधाºयाचे वनीकरण, नदीकाठाचे नूतनीकरण आदी सुविधांवर २ कोटी ६५ लाख ५ हजार रूपयांचा निधी खर्च केला जाणार आहे.
पवनार येथे नदी काठाचे बांधकाम साबरमती नदी काठावरील घाटाच्या धर्तीवर करण्यात येणार आहे. तसेच पर्यटन सुविधाच्या दृष्टीकोनातून विश्रांतीसाठी जागा, शौचालय, पिण्याचे पाणी, माहिती व जनसंपर्क केंद्र पवनार येथील बसस्टँन्डवर सुविधा निर्माण केल्या जाणार आहे.
साबरमतीच्या धर्तीवर पवनार येथील धाम नदीच्या नदीघाटाचे बांधकाम करण्यात येणार आहे. वर्धा जिल्ह्याला आचार्य विनोबा भावे व महात्मा गांधी या महापुरूषांमुळे जागतिक स्तरावर विशेष महत्व आहे. त्यामुळे विकास आराखड्यातून पवनारचा विकास करताना या बाबीला महत्व दिले जाणार आहे.
- डॉ. पंकज भोयर, आमदार, वर्धा विधानसभा