तीन दिवसांपासून लिंक फेल

By Admin | Updated: May 16, 2015 02:16 IST2015-05-16T02:16:47+5:302015-05-16T02:16:47+5:30

सतत तीन दिवसांपासून पवनार येथे सेंट्रल बँक आॅफ इंडियाची लिंक फेल असल्याने पवनार येथील नागरिकांचे व्यवहार ठप्प झाले होते. चौथ्या दिवशीही सेवा सुरळीत न झाल्याने ...

Link failed for three days | तीन दिवसांपासून लिंक फेल

तीन दिवसांपासून लिंक फेल

वर्धा : सतत तीन दिवसांपासून पवनार येथे सेंट्रल बँक आॅफ इंडियाची लिंक फेल असल्याने पवनार येथील नागरिकांचे व्यवहार ठप्प झाले होते. चौथ्या दिवशीही सेवा सुरळीत न झाल्याने नागरिकांची कामे खोळंबली होती. शुक्रवारी सायंकाळी लिंक सुरळीत झाल्याचे बँक प्रशासनाकडून सांगण्यात आले. बीएसएनएलच्या कुचकामी सेवेचा फटका नागरिकांना बसत असल्याचे बोलल्या जात आहे.
पवनार येथे नागरिकांना बँकेची सेवा देण्यासाठी सेंट्रल बँक आॅफ इंडियाची शाखा सुरू करण्यात आली. मोठ्या प्रमाणात स्थानिकांचे तसेच परिसरातील गावांमध्ये नागरिकांचे व्यवहार या बँकेमार्फत चालतात. राष्ट्रीयकृत बँकेची एकच शाखा असल्याने नागरिकांनाही या बँकेशिवाय पर्याय नसतो. सध्या शेती कामाची व लग्नसराईची धूम असल्याने पैसे काढण्यासाठी तसेच टाकण्यासाठी ग्राहकांची बँकेत गर्दी असते. रोखीचे व्यवहार थोडे कमी झाल्याने नागरिक जास्त पैसा हाताशी न ठेवता तो बँकेत जमा करीत असतात. परंतु गत तीन दिवसांपासून येथील बीएसएनएलच्या सेवेत तांत्रिक बिघाड आल्याने येथील लिंक फेल झाली आहे. चौथ्या दिवशीही लिंक फेलच असल्याने ग्राहकांचे व्यवहार ठप्प झाले होते. सोबतच बीएसएनएलची दूरध्वनी सेवाही विस्कळीत झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. एखाद्याला तात्काळ पैसे काढायचे असल्यास त्याला येथून विड्रॉल भरून वर्धा येथे मुख्य शाखेत जावून पैसे काढावे लागतात. तसेच जमा झालेले दिवसभरातील नागरिंकांचे विड्रॉल बँकेतील एखादा कर्मचारी वर्धा मुख्य कार्यालयात जावून वटवून आणत होता. या सर्व गैरव्यवस्थेमुळे येथील बँकेचे ग्राहक त्रस्त झाले होते. चौथ्या दिवशीही व्यवहार ठप्पच होते. हा प्रकार नित्याचाच झाल्याचे ग्राहक सांगतात. बँकेकडे पर्यायी व्यवस्था नसल्याने त्रास शेवटी नागरिकांनाच होतो. दुपारनंतर सेवा सुरळीत केल्याचे बीएसएनएलकडून सांगण्यात आले. परंतु सायंकाळनंतर लिंक सुरळीत झाल्याचे बँक प्रशासनाकडून सांगण्यात आले. विस्कळीत होणारी इंटरनेट सेवेचा फटका ग्राहकांना सोसावा लागत आहे.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Link failed for three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.