निवडणूक काळातही मोझरी शेकापूर गावात दारूविक्री जोरात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 04:54 PM2024-11-19T16:54:21+5:302024-11-19T16:55:20+5:30
कारवाई शून्य : दारू विक्रीसाठी लावले विक्रेत्यांनी मजूर, महिलांना त्रास
लोकमत न्यूज नेटवर्क
मोझरी (शे.) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिसरात दारू विक्रीला उधाण आले आहे. दारू विक्रेत्यांकडून विक्रीसाठी मजूर लावून विक्री केली जात आहे. निवडणूक काळात प्रमुख मार्गावर चेक पोस्ट लावल्या असताना दारूसाठा गावात येतोच कसा असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. शिवाय दारूविक्रेत्यांवर पोलिसांकडून ही कारवाई होत नसल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. निवडणुकीच्या तापत्या वातावरणात दारूविक्रीला मोझरीत उधाण आले आहे.
दारूविक्री व विक्रेत्यांविरुद्ध पोलिस विभागाकडून अद्याप प्रतिबंधात्मक कारवाई झाली नसल्याने दारूविक्रेते सैराट झाले. शालेय परिसराच्या मैदानालगत देशी विदेशीची विक्री सुरू आहे. याचा शालेय मुलांवर विपरीत परिणाम होत आहे. परिसरात मद्यपींची वर्दळ असल्याने परिसरात शिवीगाळीचे प्रकार वाढीस लागते आहे. त्यात निवडणुकीच्या धामधुमीत दारू विक्री करणाऱ्या मुख्य विक्रेत्याकडून आड राहून इतर कामगार कडून दारूविक्री सुरू केली आहे. दररोज सात ते आठ पेट्या (खोके) दारू क्षणात विक्री होत असल्याचे मद्यपींकडून बोलले जात आहे. आजूबाजूला चेक पोस्ट असूनही या दारूच्या पेट्या इथपर्यंत पोहोचतात कशा, याबद्दल नागरिकांच्या मनात शंका घर करीत आहे. परंतु याकडे पोलिस विभाग, उत्पादन शुल्क विभाग दुर्लक्ष करत असून या विक्रेत्यांची हिम्मत वाढत चालली आहे. सोबतच तंटे वाढत चालले परिणामी सामाजिक शांततेला धोका निर्माण होते. गेल्या अनेक वर्षांपासून दारूविक्री करणाऱ्या या व्यावसायिकांच्या मुसक्या आवरण्याची मागणी केली आहे.
महिलांमध्ये संताप
गावात दारुविक्री होत असल्यामुळे महिलांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मद्यपींचा महिलांना त्रस होत आहे. त्योनीही कारवईची मागणी केली आहे.
युवकांनाही जडले दारूचे व्यसन
गावातील वृद्ध मंडळीसोबत युवक तसेच किशोरवयीन मुलेही दारूच्या आहारी गेल्याचे चित्र गावात दिसून येत आहे. यामुळे गावात भांडण तंटे शिवाय घरगुती वाद वाढले आहे. यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
दारू विक्रेत्यांचा वाढलाय थाट
गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या दारूविक्री व्यवसायाला गावात सुगीचे दिवस आले आहे. पोलिस प्रशासन, उत्पादन शुल्क विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने येथील विक्रेत्यांच्या घरावर मजले चढविले जात आहे. शिवाय चारचाकी वाहनांतून बादशाही थाटाने वावरताना दिसून येत आहे. एवढेच नाही तर सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही समाजात मिरविताना दिसून येत आहे. तर दुसरीकडे दारूच्या व्यसनामुळे अनेक तरुणांसह कुटुंबाची आर्थिक, मानसिक स्थिती ढासळत चालली असल्याचे गावात चित्र आहे