जिल्ह्यात दारूची तस्करी, लगतच्या बारवरही टाच; पोलिस अधीक्षकांची धाडसी कारवाई
By चैतन्य जोशी | Published: March 30, 2024 04:33 PM2024-03-30T16:33:25+5:302024-03-30T16:34:34+5:30
पोलिस अधीक्षकांची धाडसी कारवाई, कळंबचा बार परवाना केला निलंबीत.
चैतन्य जोशी, वर्धा : वर्धा जिल्हा दारुबंदी जिल्हा असतानाही जिल्ह्यालगतच्या बारमधून तसेच वाईन शॉपीमधून मोठ्या प्रमाणात दारुची तस्करी सुरु होती.पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथील बारचा परवाना रद्द करण्यासाठी यवतामळ येथील जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव दाखल केला होता. अखेर यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी प्रस्तावाची दखल घेत कळंब येथील अवैधरित्या दारूची विक्री,पुरवठा करणारा एम.पी. ट्रेडर्स वाईन बारचा मालक मनिष सुरेश जयस्वाल रा. यवतमाळ याचा बाल परवाना ४ जून पर्यंत निलंबित करण्याचे आदेश पारित केले.
वर्धा जिल्हा दारुबंदी असतानाही यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथील बार मालक मनिष जयस्वाल हा अवैधरित्या दारुची विक्री व पुरवठा करीत होता. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विदेशी दारूची ठोक स्वरूपात विक्री करुन अनुज्ञप्तीमधील अटी व शर्तीचे उल्लंघन करीत होता. अवैध दारूविक्री, दारू पुरवठा केल्यामुळे वर्धा जिल्ह्यात विषारी दारूने अनेकांचे संसार उद्धवस्त होण्याच्या घडण्याची शक्यता देखील बळावली होती.
यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे अवैधरित्या होत असलेल्या दारूविक्रीस वेळीच प्रतिबंध घालणे गरजेचे होते. जिल्ह्याच्या सिमेवरुन चोरटी वाहतूक करणे शक्य असल्याने कळंब येथील बारमधून मोठ्या प्रमाणात विदेशी, देशी दारूसाठा वर्धा जिल्ह्यात येण्याची दाट शक्यता असल्याने लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर बारचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव यवतमाळ येथील जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता.
मनिष जयस्वालने स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी विदेशी दारूची ठोक स्वरूपात विक्री केल्यामुळे अनुज्ञप्तीमधील अटी व शर्तीचे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाल्याने कठोर कायदेशिर कारवाई करून महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ च्या तरतुदीनुसार एम.पी. ट्रेडर्स वाईन बारचा परवाना ४ जून २०२४ पर्यंत निलंबित करण्याचे आदेश पारित केले. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या निर्देशात गिरीश कोरडे यांनी केली.
जिल्ह्यालगतचे बार मालक ‘रडार’वर -
जिल्ह्यालगतच्या जवळपास ५० ते ६० बार तसेच वाईन शाॅपी मालकांची कुंडली तयार झालेली असून अनेकांचे परवाना रद्दचे प्रस्ताव संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे पाठविण्यात आलेले आहे. पुढील काळात आणखी काही बार मालकांचे परवाने निलंबित होणार असल्याची माहिती आहे.
जिल्ह्यात अशी पहिलीच कारवाई -
जिल्ह्यात १९७४ पासून दारुबंदी झाली. मात्र, तेव्हा पासून ते आजपर्यंत अशी धाडसी कार्यवाही कुणीही केलेली नव्हती. पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी थेट जिल्ह्यात दारुचा पुरवठा करणाऱ्यांवरच कारवाईची टाच उगारल्याने दारुपुरवठा करणारे तसेच विक्रेत्यांचेही धाबे दणाणले आहे. पोलिस विभागाच्या कारवाईचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.