शांतीदूतांच्या नगरीत साहित्यिकांचा मेळा; ९६ व्या. अ.भा.म. साहित्य संमेलनाचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2023 07:00 AM2023-02-03T07:00:00+5:302023-02-03T07:00:12+5:30
Wardha News राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे या शांतीदूतांच्या नगरीला ९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा मान मिळाला आहे. त्यामुळे ३ ते ५ फेब्रुवारीपर्यंत राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरीत साहित्यिकांचा महाकुंभमेळा भरणार असून शुक्रवारी ग्रंथदिंडीने श्रीगणेशा होणार आहे.
वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे या शांतीदूतांच्या नगरीला ९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा मान मिळाला आहे. त्यामुळे ३ ते ५ फेब्रुवारीपर्यंत राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरीत साहित्यिकांचा महाकुंभमेळा भरणार असून शुक्रवारी ग्रंथदिंडीने श्रीगणेशा होणार आहे.
शुक्रवारी सकाळी आचार्य विनोबा भावे सभामंडपातील प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी, शिक्षण व मराठी भाषामंत्री दीपक केसरकर, संमेलनाध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर, मावळते संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे, स्वागताध्यक्ष दत्ता मेघे यांच्यासह ज्येष्ठ हिंदी कवी व समीक्षक डॉ. विश्वनाथप्रसाद तिवारी, हिंदी कवी डॉ. कुमार विश्वास, आमदार डॉ. विश्वजीत पाटील, डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, खासदार रामदास तडस तसेच सर्व आमदारांची उपस्थिती राहणार आहे.
संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी सकाळी ८ वाजता महात्मा गांधी पुतळ्यापासून ग्रंथदिंडी निघणार असून अखिल भारतीय महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. दिवसभर या परिसरात भरगच्च कार्यक्रम होणार असून यात संमेलनाध्यक्षकांचे भाषण, विविध विषयांवरचे परिसंवाद, निमंत्रितांचे कविसंमेलन, विविध कट्टयांचे उद्घाटन असे कार्यक्रम राहणार आहे.
विविध ठिकाणांहून महामंडळाचे पदाधिकारी, साहित्यिक, प्रतिनिधी वर्धेत दाखल झाले आहेत. आचार्य विनोबा भावे सभामंडपात सकाळी १०.३० वाजता संमेलनाचे उद्घाटन, दुपारी ०२.०० वाजता ‘कर्मयोगी गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि महाराष्ट्राची प्रबोधन परंपरा’ विषयावर परिसंवाद, दुपारी ४.३० वाजता संमेलनाध्यक्षाचे भाषण, सायंकाळी ५.३० वाजता ‘आम्हा लेखकांना काही बोलायचे आहे’ यावर परिसंवाद, सायंकाळी ७ वाजता ‘ललितेतर साहित्याची वाढती लोकप्रियता’ वर परिसंवाद, रात्री ८ वाजता नियंत्रितांचे कविसंमेलन होईल तर मनोहर म्हैसाळकर सभामंडपामध्ये दुपारी २ वाजता कथाकथन, सायंकाळी ६.३० वाजता ‘विदर्भातील बोली भाषा’ यावर परिसंवाद, रात्री ८ वाजता ‘मृदगंध वैदर्भीय काव्यप्रतिभेचा’ विशेष कार्यक्रम व इतर कार्यक्रम तसेच दुपारी २ वाजता प्रा. देवीदास सोटे कविकट्ट्याचे उद्घाटन, कविवर्य सुरेश भट गझल कट्ट्याचे उद्घाटन व दुपारी ४ वाजता ग. त्र्यं. मांडखोलकर प्रकाशन मंचचे उद्घाटन होईल.