सामाजिक तळमळीतून होते साहित्याची निर्मिती; ९६ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2023 05:54 PM2023-02-03T17:54:54+5:302023-02-03T17:55:46+5:30
Nagpur News राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरीमध्ये आज ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरी (वर्धा) : सामाजिक तळमळीतून साहित्याची निर्मिती होते. साहित्यातून समाजाला जगण्याचे बळ मिळते. त्यामुळे अशा साहित्य संमेलनाची आवश्यकता असून येथील आयोजन हे सुदृढ सांस्कृतिक लोकशाहीचे विराट रूप आहे, असेही प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरीमध्ये आज ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, संमेलनाध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर, मावळते अध्यक्ष भारत सासने, स्वागताध्यक्ष दत्ता मेघे, प्रमुख अतिथी हिंदी साहित्यिक डॉ. विश्वनाथप्रसाद तिवारी, हिंदी कवी डॉ. कुमार विश्वास, डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार डॉ. पंकज भोयर, अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे, संरक्षक सागर मेघे, कार्याध्यक्ष प्रदीप दाते, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या स्पर्शामुळेच नव्हे तर वास्तव्यामुळे ही भूमी पावन झाली आहे. विशेष म्हणजे या महात्म्यांचे साहित्यात मोलाचे योगदान आहे. सेवाग्राम येथील चरखागृहात बापू आणि विनोबा यांचे शिल्प उभारण्यात आले आहे. त्यांचे विचार आणि जीवन नव्यापिढीला कळावे, याकरिता आमदार डॉ. पंकज भोयर यांच्यासह आयोजकांनी त्या ठिकाणी ‘लाइट अॅण्ड फाउंटेन शो’ ची मागणी केली होती. त्याकरिता निधी उपलब्ध करून देत लवकरच निर्मिती करणार, अशी घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यावेळी विश्वनाथप्रसाद तिवारी, डॉ. कुमार विश्वास, स्वागताध्यक्ष दत्ता मेघे, प्रदीप दाते यांचीही भाषणे झाली.
शासनाकडून दोन्ही अध्यक्षांचा सत्कार
अखिल भारतीय साहित्य संमेलनाकरिता उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आयोजकांच्यावतीने शाल, सूतमाळ, ग्रंथसंपदा आणि गांधी चरखा देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महराष्ट्र शासनाच्यावतीने संमेलनाचे मावळते अध्यक्ष भारत सासने व विद्यमान संमेलनाध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर यांचे स्वागत केले.
अध्यक्षांना देणार राज्य अतिथींचा दर्जा
अखिल भारतीय साहित्य संमेलनातून साहित्यिक लेखकांना मान देण्याचा प्रयत्न केला जातो. साहित्यिकांचा मानसन्मान करणे हे, शासनाचेही कर्तव्य आहे. साहित्यिकांच्या लेखणीतूनच राजकारण्यांना दिशा मिळत असते. म्हणूनच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना राज्य अतिथींचा दर्जा देण्याची मागणी केली होती, ही मागणी पूर्ण करीत असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी करून पुढील कार्यवाही लवकरच केली जाणार असल्याचेही सांगितले.
मराठी शाळा बंद होतेय, त्यावरही चर्चा व्हावी : दीपक केसरकर
मायमराठीच्या संवर्धनासाठी, समृद्धतेसाठी साहित्यिकांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरू आहे. त्याला शासनाकडूनही मदतीचा हात दिला जात आहे. महाराष्ट्र ही सामाजिक क्रांतीची भूमी आहे आणि वर्ध्यात हे संमेलन होत असल्याने वेगळीच उंची प्राप्त झाली आहे. त्यामुळेच आज या साहित्यनगरीमध्ये सारस्वतांची पंढरी अवतरली आहे. मराठी विश्वकोषाची निर्मिती महाराष्ट्राने केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील साहित्याचा हा रथ पुढे नेण्याकरिता सर्वांचा हातभार लागण्याची गरज आहे. म्हणून मी मंत्री असलो तरीही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सहकार्याने संमेलनाकरिता दोन कोटींचा निधी मंजूर केला आहे. सध्या मराठी शाळा बंद पडत असून याबाबतही या साहित्य संमेलनात चर्चा व्हावी, अशी अपेक्षा शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केली.