तरुण पिढीसाठी साहित्य डिजिटल झाले पाहिजे - नितीन गडकरी

By अभिनय खोपडे | Published: February 6, 2023 11:01 AM2023-02-06T11:01:17+5:302023-02-06T11:02:39+5:30

९६ व्या साहित्य संमेलनाचे सूप वाजले

Literature should go digital for the younger generation says Nitin Gadkari in akhil bharatiya marathi sahitya sammelan wardha | तरुण पिढीसाठी साहित्य डिजिटल झाले पाहिजे - नितीन गडकरी

तरुण पिढीसाठी साहित्य डिजिटल झाले पाहिजे - नितीन गडकरी

Next

राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरी (वर्धा) : तरुणांसह सर्वांचीच पुस्तक वाचण्याची आवड कमी होत चालली आहे. पुस्तक खरेदी करणारे आज रोडावलेले आहेत. त्यामुळे आजची गरज ओळखून साहित्यिक, प्रकाशन संस्था यांनी पुस्तकांना डिजिटल स्वरूपात प्रस्तुत करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यादृष्टीने सर्वांनीच पाऊल टाकावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरीत संपन्न झाले. या समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, स्वागताध्यक्ष माजी खा. दत्ता मेघे, वर्ध्याचे आ. पंकज भोयर, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे, विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष प्रदीप दाते, महामंडळाच्या कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, कोषाध्यक्ष प्रकाश पागे, संरक्षक सागर मेघे, प्रमुख कार्यवाह विलास मानेकर, वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, समन्वयक संजय इंगळे तिगावकर, कार्यवाह डॉ. अभ्युदय मेघे, समन्वयक रवींद्र शोभने आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी संमेलन गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

या समारोपीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष प्रदीप दाते यांनी केले. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. म. रा. जोशी व प्रकाशक राजू बर्वे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ना. नितीन गडकरी यांनी वर्धा ही राष्ट्रपिता महात्मा गांधी, विनोबा, जमनालाल बजाज, सिंधुताई सपकाळ, पांडुरंग खानखोजे यांची पवित्र भूमी असून वर्ध्याच्या या ऐतिहासीक भूमीवर साहित्य संमेलनाच्या निमित्ताने लोकांना विचारांचे अमृत मिळाले. हे विचार नवी दिशा देणारे असतील, असे सांगून ना. गडकरी म्हणाले की, ज्ञानेश्वरी, ग्रामगीता, गजानन महाराजांची पोथी डिजिटल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोथी पूर्णत: डिजिटल झाली आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे यांनी ९७ वे मराठी साहित्य संमेलन घेण्यास इच्छुक असणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी १५ एप्रिल २०२३ पर्यंत महामंडळाकडे प्रस्ताव पाठवावेत, असे आवाहन केले. समारोपीय कार्यक्रमाचे संचालन सीमा रोठे-शेटे यांनी केले, तर आभार डॉ. गजानन नारे यांनी मानले. राष्ट्रगीताने साहित्य संमेलनाची सांगता झाली.

साहित्य संमेलनात एकूण दहा ठराव पारित करण्यात आले. यामध्ये पुरस्कार निवड समितीच्या सदस्यांनी पुरस्कारासाठी मराठी ग्रंथाची निवड करताना ते ग्रंथ व्यवस्थित वाचून निर्णय घ्यावा आणि पुरस्कार जाहीर केल्यानंतर तो शासनाने परत घेऊ नये. तसेच महाराष्ट्रातील मराठी माध्यमांच्या शाळा आणि हैदराबादमधील मराठी साहित्य परिषदेच्यावतीने चालविण्यात येणारे महाविद्यालय बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्याला अनुदान द्यावे, मराठी विनाअनुदानित, अनुदानित शाळा व सेमी इंग्रजी शाळेत रूपांतर होणार नाही याची काळजी घ्यावी, आदी महत्त्वाच्या ठरावाचा समावेश आहे.

माणसे जोडण्यासाठी साहित्य संमेलन आवश्यकच : न्या. चपळगावकर

साहित्य संमेलनांवर होणारा खर्च आटोपशीर व्हायला हवा. साहित्य संमेलन समाज आणि साहित्यिक यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी आवश्यक आहे. माणसे जोडली गेली पाहिजे, त्यासाठी संमेलने गरजेची आहेत. संमेलनातून आवाज बुलंद होतो. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा पहिला आवाज साहित्य संमेलनातून उठला, असे प्रतिपादन समारोपीय कार्यक्रमात ९६ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर यांनी केले. विदर्भ आणि मराठवाडा हे पूर्वी विदर्भ साहित्य संघातच होते. आजही या संमेलनाच्या रूपाने विदर्भ, मराठवाडा यांचे एकीकरण आपल्याला दिसले. मतभिन्नता, विचारप्रवाह वेगवेगळे असले तरी साहित्यिकांमध्ये दुरावा राहू नये म्हणून आपण विद्रोही साहित्य संमेलनालाही भेट देऊन दुरावा दूर करण्याचा प्रयत्न केला. याचा मला आनंद आहे, असे ते म्हणाले. आचार्य विनोबा भावे यांच्याएवढे लेखन कुणीही केलेले नाही. मात्र विनोबांना साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होता आले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Literature should go digital for the younger generation says Nitin Gadkari in akhil bharatiya marathi sahitya sammelan wardha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.