साहित्य, सामाजिक पुरस्कार वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 09:54 PM2019-02-04T21:54:44+5:302019-02-04T21:55:10+5:30

यशवंतराव दाते स्मृती संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या साहित्य व सामाजिक पुरस्कारांचे वितरण ज्येष्ठ समीक्षक डॉ. हरिशचंद्र थोरात, मुंबई यांच्या हस्ते करण्यात आले.

Literature, social award distribution | साहित्य, सामाजिक पुरस्कार वितरण

साहित्य, सामाजिक पुरस्कार वितरण

Next
ठळक मुद्देकोल्हे, शिरसाट, पोतुलवार, महाजन, बोरूडे, सबाने मानकरी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : यशवंतराव दाते स्मृती संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या साहित्य व सामाजिक पुरस्कारांचे वितरण ज्येष्ठ समीक्षक डॉ. हरिशचंद्र थोरात, मुंबई यांच्या हस्ते करण्यात आले.
स्थानिक सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालयाच्या सभागृहात आयोजित या पुरस्कार वितरण समारोहाला संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते, सचिव संजय इंगळे तिगावकर, पुरस्कार समिती संयोजक डॉ. राजेंद्र मुंढे, प्रा. पद्माकर बाविस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या समारोहात अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा बाबा पद्मनजी साहित्य पुरस्कार मुंबई येथील अविनाश कोल्हे यांना ‘चौकट वाटोळी’ या कादंबरीकरिता देण्यात आला. याशिवाय ‘झाली कथा लिहून?’ या कथासंग्रहाकरिता मधुकर धर्मापुरीकर (नांदेड) यांना शिक्षणमहर्षी बापूराव देशमुख कथासंग्रह पुरस्कार, मोहन शिरसाट (वाशिम) यांच्या ‘नाही फिरलो माघारी’ संग्रहाला संत भगवानबाबा काव्यसंग्रह पुरस्कार, डॉ. बालाजी पोतुलवार (नांदेड) यांना ‘मराठी स्त्री नाटककार : शोध आणि बोध’ या ग्रंथाकरिता अंजनाबाई इंगळे तिगावकर स्मृती स्त्रीवादी साहित्य पुरस्कार, ‘आबाची गोष्ट’ या कथासंग्रहाकरिता आबा महाजन (जळगाव) यांना पद्माकर श्रावणे स्मृती बालसाहित्य पुरस्कार, ‘चिकनगुनिया झालाच पाहिजे’ या कथासंग्रहाकरिता संजय बोरूडे (अहमदनगर) यांना भाऊराव शिंगाडे स्मृती विनोदी साहित्य पुरस्कार तर डॉ. दामोदर खडसे लिखित ‘बादलराग’ या कांदबरीच्या मराठी अनुवादासाठी चंद्रकांत भोंजाळ (मुंबई) यांना यशवंतराव दाते स्मृती अनुवाद पुरस्कार देण्यात आला.
याशिवाय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता अरूण सबाने यांना हरीश मोकलकर स्मृती सामाजिक ऋण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. हरिश्चंद्र थोरात यांच्या हस्ते सर्व पुरस्कारप्राप्त लेखकांना धनादेश, मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
तर अनुवादित साहित्याची आज दखल घेतल्या जात असल्याबद्दल चंद्रकांत भोंजाळ यांनी समाधान व्यक्त केले. मराठी जगतातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल आपल्या मनोगतातून आनंद व्यक्त करीत मोहन शिरसाट यांनी ‘हवी गं तुझ्याकडून माफी’ ही कविता सादर केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय इंगळे तिगावकर यांनी केले. पुरस्कारांबाबतची माहिती डॉ. राजेंद्र मुंढे यांनी दिली. रंजना दाते, डॉ. स्मिता वानखेडे, शेषराव बिजवार यांनी मानपत्रांचे वाचन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. पद्माकर बाविस्कर यांनी केले तर आभार प्रदीप दाते यांनी मानले.
कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता प्रा. डी.के. देशमुख, गुणवंत डकरे, सुरेश वानखेडे, पंडित देशमुख, हेमंत दाते, नरेंद्र दंढारे, सुमती वानखेडे, महेश मोकलकर, अभिजित श्रावणे, अभय शिंगाडे, राजदीप राठोर, राहुल तेलरांधे, आकाश दाते, रजत देशमुख, अनिल काळे आदींचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील साहित्यप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. व्याख्यानमालेच्या द्वितीय सत्रात वºहाडी कवी, गझलकार अमरावती येथील नितीन देशमुख यांची प्रश्न टांगले आभाळाला ही काव्यमैफल रंगली. देशमुख यांचे पैजण आण बिकॉज वसंत इज कमिंग सून हे काव्यसंग्रह प्रसिद्ध असून प्रश्न टांगले आभाळाला हा संग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे. या काव्यमैफलीला वर्धेकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
लेखकांनी मांडल्या भूमिका
एकाच आयुष्यात दोन जीवन जगण्याचा अनुभव वाट्याला आला आहे, अशी भावना व्यक्त करीत अरुणा सबाने या स्त्री ही केवळ स्त्री नसते तर माणूसही असते, ही ओळख कायम ठेवा, असे आवाहन केले. ती जी काल होती, ती आज नाही, हे सिद्ध करणारी जागतिकीकरणाच्या काळातील नव्या पिढीची नायिका चाकटी मोडून जीवन जगणारी आहे, अशी भूमिका कादंबरीकार अविनाश कोल्हे यांनी मांडली.

Web Title: Literature, social award distribution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.