चिमुकली 'आर्या' धावली अवघ्या ५.५० मिनिटात १००० मीटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 11:37 AM2021-06-10T11:37:18+5:302021-06-10T11:37:43+5:30
Wardha News चिमुकली आर्या पंकज टाकोने ही आशिया बुक रेकॉर्डमध्ये नाव नाेंदविण्यासाठी परिश्रम घेत असून तिने पुलगाव येथे अवघ्या ५ मिनिट ५० सेकंदात १ हजार मीटरचे अंतर धावून तिने सुरू केलेल्या कठोर परिश्रमाचा परिचय दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : चिमुकल्या आर्या पंकज टाकोने ही आशिया बुक रेकॉर्डमध्ये नाव नाेंदविण्यासाठी परिश्रम घेत असून तिने पुलगाव येथे अवघ्या ५ मिनिट ५० सेकंदात १ हजार मीटरचे अंतर धावून तिने सुरू केलेल्या कठोर परिश्रमाचा परिचय दिला.
आर्या ही आपली नोंद आशिया बुक रेकॉर्डमध्ये नोंदविले जावे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून मागील दीड ते दोन वर्षांपासून दररोज तीन ते चार किमी धावण्याचा सराव करीत आहे. येत्या २० रोजी ती वर्धा येथे फायनलकरिता धावणार आहे. या सर्व प्रसंगाचे चित्रिकरण ड्रोन कॅमेरे द्वारे करून ते आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदविण्यासाठी पाठविण्यात येणार आहे. बुधवार ९ जूनला आर्या हिने पुलगाव येथील टिळक चौक ते दारूगोळा भांडाराचे प्रमुख द्वार हे एक हजार मीटरचे अंतर अवघ्या ५ मिनिट ५० सेकंदात धावून पूर्ण केले.
आर्या हिचे वडील पंकज टाकोने हे व्हॉलिबॉलचे राष्ट्रीय खेळाडू असून ते वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी आर्या सध्या परिश्रम घेत आहे. आर्या हिने पुलगाव येथे प्रात्यक्षिकादम्यान एक हजार मीटरचे अंतर ५.५० मिनिटात पूर्ण केले असून या पूर्वी आशिया बुक रेकॉर्डमध्ये चायनाच्या ५ वर्षीय मुलाचा रेकॉर्ड आहे. आर्या हिचे वय ३ वर्ष ४ महिने आहे. तिने हा विक्रम मोडत नवा विक्रम रचल्यास तिच्यासह भारताचे नाव लौकिक होणार आहे.