१,३४२ मतदान केंद्रांवर राहणार सीसीटीव्ही कॅमेऱ्याची थेट 'वॉच'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 05:29 PM2024-10-22T17:29:06+5:302024-10-22T17:29:39+5:30
विधानसभेचा वाजला बिगुल : जिल्हाधिकारी कार्यालयातून ५० टक्के केंद्रांतील हालचालींवर राहणार लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून, प्रशासनही कामाला लागले आहेत. प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. निवडणुका शांततेत पार पडाव्यात, यासाठी प्रशासन पूर्ण तयारीत असून मतदान केंद्रांवर कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडता कामा नये, याचीही दक्षता घेत आहे. त्यासाठी मतदान केंद्रांवर वेब कास्टिंगच्या माध्यमातून थेट नजर ठेवण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातून या सर्व केंद्रांवरील हालचालींवर बारीक नजर ठेवण्यात येईल. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर कोणत्याही प्रकारची अनुचित घटना होणार नाही. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे व शांततेत पार पाडण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर आहे. त्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक तयारीही करण्यात आली आहे. मागील काही निवडणुकीत गोंधळ उडालेल्या मतदान केंद्रांचीही यादी तयार करीत येथे अधिक लक्ष देण्यात येणार आहे. मतदान केंद्रांच्या आतील सर्व हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.
त्यासाठी वेब कास्टिंगची मदत याही वेळी घेण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीत याचा चांगला फायदा प्रशासनाला झाला होता. जिल्ह्यात चार मतदारसंघ असून १,३४२ मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत.
सीसीटीव्ही लागणार
मतदार केंद्रांबाहेरील हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत.
संवेदनशील केंद्रावरही राहणार बारीक लक्ष
मागील निवडणुकीत जी कैटे संवेदनशील होती. अशा केंद्रांवर बारीक लक्ष राहणार आहे.
मतदारसंघ मतदान केंद्र
आर्वी ३१०
देवळी ३३५
हिंगणघाट ३५१
वर्धा ३४६