पशुधन विकास अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
By Admin | Published: March 25, 2017 01:09 AM2017-03-25T01:09:07+5:302017-03-25T01:09:07+5:30
पारडी येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ चे पशुधन विकास अधिकारी डॉ. गजानन शालीग्राम मोकदम (५५) यांनी
मोफत औषधाकरिता केली ३०० रुपयांची मागणी
तळेगाव (श्यामजीपंत) : पारडी येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ चे पशुधन विकास अधिकारी डॉ. गजानन शालीग्राम मोकदम (५५) यांनी लाचेची रक्कम स्वीकारल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरोपी विरूद्ध कारवाई केली. या प्रकरणी पोलीस स्टेशन तळेगाव (श्या.पं.) येथे कलम ७, १३ (१)(ड) सहकलम १३ (२) ला प्र.का. अन्वये गुन्हा नोंद केला आहे.
जनावरांसाठी घेतलेले टॉनिक विनामुल्य असतानाही डॉ. मोकदम यांनी तक्रारदाराकडे २५० रुपयांची मागणी केली. यावरून तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे २३ मार्च रोजी तक्रार नोंदविली. त्यावरून २३ मार्च रोजी सापळा रचून डॉ. गजानन मोकदम यांनी विनामुल्य मिळणारे मिनरल टॉनिक तक्रारदारास पुरविल्याबद्दल बक्षीस म्हणून २५० रुपये व उशीर झाल्याने ५० रुपये अधिकचे अशी एकूण ३०० रुपयांच्या लाचेची मागणी केली. यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने कारवाई करून सदर वैद्यकीय अधिकाऱ्यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या प्रकरणी आरोपीविरूद्ध तळेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कामगिरी लाचलुचपत प्रतिबंध विभाग नागपूरचे पोलीस अधीक्षक दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सारीन दुर्गे, अतुल वैद्य, अनूप राऊत, रागिणी हिवाळे विजय उपासे, श्रीधर उईके यांनी केली.(वार्ताहर)