वर्धेचे पशुधन विकास अधिकारी तडकाफडकी निलंबित
By रवींद्र चांदेकर | Published: May 13, 2024 08:17 PM2024-05-13T20:17:29+5:302024-05-13T20:18:30+5:30
प्रशासकीय गैरवर्तन भाेवले : कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे आदेश
वर्धा : येथील जिल्हा परिषदेचे पशुधन विकास अधिकारी (तांत्रिक) डॉ. भागचंद वासुदेव वंजारी यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. गंभीर स्वरुपाच्या प्रशासकीय गैरवर्तनाच्या अनुषंगाने त्यांना निलंबित केल्याचे आदेश सोमवारी राज्याच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने निर्गमित केले आहे.
डॉ. भागचंद वंजारी यांच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाच्या प्रशासकीय गैरवर्तनाच्या अनुषंगाने विभागीय चौकशीची कारवाई करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील नियम ४ (१) (अ) अन्वये राज्य शासनाचे कार्यासन अधिकारी मानसिंग पाटील यांनी सोमवारी डॉ. भागचंद वंजारी यांच्या निलंबनाचे आदेश निर्गमित केले आहे. डॉ. वंजारी यांना शासन सेवेतून तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. पुढील आदेशापर्यंत हे निलंबन कायम राहणार आहे. निलंबन काळात डॉ. वंजारी यांचे मुख्यालय गडचिरोली येथील जिल्हा पशुसंवर्धन सर्वचिकित्सालय राहणार आहे. निलंबन कालावधीत डॉ. भागचंद वंजारी यांना पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
डॉ. भागचंद वंजारी यांना निलंबन कालावधीत महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेत्तर सेवा आणि निलंबन, बडतर्फी, सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम, १९८१ मधील नियम ६८ (१) (ए) अनुसरून देय निर्वाह भत्ता व महागाई भत्ता दिला जाणार आहे. त्यांना निलंबन कालावधीमध्ये कोणतीही खासगी सेवा किंवा व्यवसाय करता येणार नाही. निलंबन काळात त्यांनी खासगी सेवा किंवा व्यवसाय केल्यास ते शिस्तभंगाची कार्यवाहीस पात्र राहतील, असेच निलंबन काळातील निर्वाह भत्ता मिळण्यास अपात्र ठरतील, असेही कार्यासन अधिकारी मानसिंग पाटील यांनी आदेशात नमूद केले आहे.
डॉ. भागचंद वंजारी यांच्या निलंबनाचे आदेश प्राप्त झाले. त्यांच्याविरुद्ध कार्यालयीन गोपनीयतेचा भंग करण्याचा आरोप आहे. नियमानुसार पुढील कारवाई केली जाईल.
-रोहन घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. वर्धा