प्लास्टिक पिशवीच्या वापरामुळे पशुधन धोक्यात
By Admin | Published: March 9, 2017 12:58 AM2017-03-09T00:58:36+5:302017-03-09T00:58:36+5:30
प्लास्टिक व नायलॉन पिशव्यांचा वाढता वापर व त्याचे विपरित परिणाम पाहता शासनाने या पिशव्यांच्या वापरावर बंदी घातली आहे.
कारवाईकडे दुर्लक्ष : बंदीनंतरही प्लास्टिकचा वापर सुरूच
पुलगाव : प्लास्टिक व नायलॉन पिशव्यांचा वाढता वापर व त्याचे विपरित परिणाम पाहता शासनाने या पिशव्यांच्या वापरावर बंदी घातली आहे. स्थानिक नगर प्रशासनाने शहरात प्लास्टिक निर्मूलन मोहीम राबविली. परंतु शहरात प्लास्टिक पिशव्यांचे खच पाहायला मिळतात. या प्लास्टिक पिशव्या पशु खाऊन फस्त करीत असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत प्रधानमंत्री, राष्ट्रपती व मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.
प्लास्टिक खाण्यामुळे होत आजारापासून या पशुंचे रक्षण करण्यासाठी पशुवैद्यकीय रूग्णालयात क्ष किरण मशीनचा वापर करून गुरांच्या पोटातील पिशव्या काढण्यासाठी विनामुल्य शस्त्रक्रिया करण्याची सुविधा देण्यात यावी. तसेच गुरांचे प्राण वाचवावे, अशी मागणी करण्यात आली. स्थानिक पशुपालक अतुल भार्गव यांनी सदर निवेदनाच्या प्रती पाठविल्या आहे.
शहरातील गल्लीबोळात पडून असलेल्या प्लास्टिक पिशव्या गुरांच्या खाण्यात जातात. त्यामुळे निर्माण होणाऱ्या आजारामुळे शहरातील गुराढोराच्या जितीतास धोका निर्माण झाला आहे. गोहत्या बंदीचा नारा लावणाऱ्या शासनाने प्लास्टिक व नायलॉन पिशव्याच्या वापरावर कायदेशीर बंदी घालून पशुधनाच्या जीवनाचे रक्षण करावे, अशी गोपालकांची मागणी आहे.
वापर झाल्यावर फेकण्यात येत असलेल्या प्लास्टिक पिशव्यांनी शहरातील गल्लीबोळातील नाल्या, रिकामे मैदान, रेल्वेलाईन, संरक्षक भिंती असा परिसर व्यापला आहे. अनेकदा या पिशव्यात आणलेल्या खाद्यपदार्थ व उरलेले अन्नाच्या वासामुळे चाऱ्याच्या शोधात फिरणारी गुरे या पिशव्या खातात. या पिशव्या गुरांच्या पचनसंस्थेत अडकुन असतात. त्यामुळे गुरांना आजार जडतात. या आजारामुळे शहरातील गुरेढोरे मृत्यूच्या जबड्यात गेली. याचा फटका गोपालकांना बसतो. एकीकडे शासन गोहत्या बंदीचा नारा लावत आहेत. तर दुसरीकडे प्लास्टिक पिशव्याच्या वापरावर घातलेल्या बंदी कायद्याचा काटेकोरपणे वापर होत नसल्यामुळे देशात हजारो गाई मृत्यूमुखी पडत आहे. हे देखील एक वास्तव आहे. अशाप्रकारे होत असलेली गोहत्या थांबविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने प्रयत्न करण्याची गरज व्यक्त होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्लास्टिक पिशव्याच्या वापरावर घातलेल्या बंदी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी व पशुंच्या जीवनाचे रक्षण करावे, अशी मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)
समारंभात प्लास्टिकजन्य वस्तूंचा वापर वाढला
कार्यक्रमानिमित्त आज सर्वत्र प्लास्टिक पत्रावळी, द्रोण, ग्लास वापरात येतात. त्यामुळे प्लास्टिकमुळे होत असलेल्या कचऱ्यात भर पडते. या पत्रावळीला चिकटलेले अन्न खाण्याच्या नादात प्लास्टिक पत्रावळी गुरांच्या पोटात जातात. दिवसेंदिवस या वस्तुंचा वापर वाढला आहे. यासारख्या वस्तुंचे योग्यरित्त्या निर्मूलन करण्याची गरज व्यक्त होत आहे. अनेकदा पर्यावरणप्रेमी संस्थांकडून या वस्तुंचा वापर टाळण्याचे आवाहन केले जाते. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसून येते.