शेतकऱ्यांच्या कर्जाची दलालांकडून उचल
By admin | Published: December 27, 2014 10:55 PM2014-12-27T22:55:04+5:302014-12-27T22:55:04+5:30
शेतकऱ्यांना सातबाऱ्यावर पीक कर्ज दिले जाते़ हे कर्ज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाते़ आयसीआयसीआय बँक हिंगणघाटने सागवान खसऱ्यावर सातबाऱ्यावर नोंद करीत शेतकऱ्यांना कर्ज मंजूर केले़
आयसीआयसीआय बँकेतील प्रताप : संगनमताने व्यवहार झाल्याचा संशय
प्रशांत हेलोंडे - वर्धा
शेतकऱ्यांना सातबाऱ्यावर पीक कर्ज दिले जाते़ हे कर्ज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाते़ आयसीआयसीआय बँक हिंगणघाटने सागवान खसऱ्यावर सातबाऱ्यावर नोंद करीत शेतकऱ्यांना कर्ज मंजूर केले़ हे कर्ज शेतकऱ्यांना मंजूर झाले असताना रकमेची उचल चक्क दलालाने केली़ यात चार शेतकऱ्यांची ५ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक झाली आहे़
आयसीआयसीआय बँक हिंगणघाट येथून शेतकऱ्यांना सात-बाऱ्यावर कर्ज मंजूर करण्यात आले़ यासाठी बँकेने विविध कागदपत्रांसह प्रत्येक शेतकऱ्याला पाच ते सात कोरे धनादेश जमा करण्यास सांगितले़ यानुसार शेतकऱ्यांनी धनादेश जमा केले़ यानंतर शेतकऱ्यांना कर्ज देण्यात आले़ पोहणा येथील विवेक बोकारे यांना ५ लाख ४० हजार ८०० रुपयांचे कर्ज मंजूर झाले़ पहिल्या टप्प्यात ३ लाख ५० हजार रुपये खात्यात जमा झाले़ कृष्णाजी दुधलकर यांना ३ लाख ७७ हजारांचे कर्ज मंजूर करून २ लाख ४३ हजार रुपये खात्यात जमा झाले़ गजानन वानखडे यांना २ लाख १२ हजार रुपयांचे कर्ज मंजूर करून १ लाख ७७ हजार ६३१ रुपये खात्यात जमा केले़ नानाजी झाडे यांना ७ लाख ६० हजार रुपयांचे कर्ज मंजूर करून ४ लाख ६० हजार रुपये जमा केले़
या कर्जातून दुधलकर यांनी ८३ हजार, बोकारे यांनी १ लाख ५० हजार, झाडे यांनी ३ लाख ५० हजार तर वानखडे यांनी ७० हजार १३१ रुपये वापरले़ उर्वरित संपूर्ण रक्कम दलाल व कर्मचाऱ्यांनी संगणमत करून फस्त केली़ यात शेतकऱ्यांना ५ लाख ३० हजार रुपयांचा फटका बसला़
दलाल मुकेश रोडे याच्यामार्फत गेलेली प्रकरणे आयसीआयसीआय बँकेने मंजूर करून कर्ज दिले़ कागदपत्रे व कोरे धनादेश शेतकऱ्यांनी बँकेचे कर्मचारी सुयोग काळे यांना दिले होते़ कर्मचाऱ्याला दिलेले धनादेश दलालाकडे कसे गेले, असा प्रश्न उपस्थित होत आहे़ शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जातील उर्वरित रक्कम मुकेश रोडे व रोहन महाजन यांनी कर्मचाऱ्यांशी संगणमत करून हडप केली़ याबाबत चारही शेतकऱ्यांनी हिंगणघाट पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली़ या प्रकरणी दलाल मुकेश रोडेविरूद्ध भादंविच्या कलम ४२०, ४०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला़ प्रकरणाचा तपास झुरमुरे यांच्याकडे देण्यात आला आहे़
या प्रकरणात बँक व कर्मचाऱ्यांना अभय देण्यात आल्याचे दिसते़ या संपूर्ण प्रकाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे गरजेचे झाले आहे़