वर्ध्यात ‘अनलॉक’ला प्रशासनाच्या नियमांचे ‘लॉक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 05:00 AM2020-07-02T05:00:00+5:302020-07-02T05:00:12+5:30
राज्यात कोरोनाचे थैमान सुरु असतानाच वर्ध्यातील हिंदी विश्वविद्यालयामध्ये २ फेब्रुवारीला बिजींग येथून १३ विद्यार्थीनी आल्यात. त्यामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पण, जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार त्यांना विद्यापीठाच्या वसतीगृहातच १४ दिवस गृह विलगीकरणात ठेवण्यात आले. ही विदर्भात पहिली विलगीकरणाची केस होती.
लॉकडाऊनशंभरी
आनंद इंगोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आज किती रुग्ण सापडले... कोणता परिसर सील केला...तो रुग्ण कुठून आला...त्या क्वारंटाईन केले काय? असे अनेक प्रश्न आणि त्याचे उत्तर शोधण्यासाठी प्रत्येकाची होणारी धडपड गेल्या शंभर दिवसांपासून वर्धा जिल्ह्यातील नागरिक अनुभवत आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून वर्धेकरांच्या मनात निर्माण झालेली कोरोनाची भीती आता हळूहळू ओसरायला लागली. शासनाच्या आदेशानंतर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातही शिथिलता दिली असून या अनलॉकमध्ये नियम व अटी कायम असल्याने नागरिकांच्या ‘सैराट’ पणाला बंधने कायम आहे.
राज्यात कोरोनाचे थैमान सुरु असतानाच वर्ध्यातील हिंदी विश्वविद्यालयामध्ये २ फेब्रुवारीला बिजींग येथून १३ विद्यार्थीनी आल्यात. त्यामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पण, जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार त्यांना विद्यापीठाच्या वसतीगृहातच १४ दिवस गृह विलगीकरणात ठेवण्यात आले. ही विदर्भात पहिली विलगीकरणाची केस होती. तेव्हापासून जिल्हा प्रशासनाने आरोग्य, महसूल, नगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या मदतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु केल्यात. पंतप्रधानांच्या आवाहनानुसार वर्धेकरांनी २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू पाळल्यानंतर लगेच २३ मार्चपासून जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली. औषधी आणि जीवनावश्यक वस्तंूंचे दुकाने वगळता, बाकी उद्योग व इतर व्यवसाय बंद करण्यात आले. जिल्ह्याच्या प्रत्येक सीमा आणि अंतर्गत रस्ते बंद करुन २४ तास तपासणी नाके लावले. बाहेर राज्यातून किंवा बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्यांचा ओघ सुरु झाला. सोबतच वाहतूक व्यवस्थेअभावी जिल्ह्यात विविध ठिकाणी असलेल्या कामगाराचाही प्रश्न निर्माण झाला. जवळपास साडेआठ हजार कामगारांसाठी निवारागृहाची व्यवस्था करुन त्यांना त्यांच्या गावी पोहोचविण्यात आले. लॉकडाऊनच्या तब्बल ४५ दिवसानंतर एका महिलेचा मृत्यूपश्चात अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पहिल्या रुग्णाची नोंद झाली. त्यानंतर बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्यांमुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार होत गेला. रुग्ण आढळून आल्यानंतर प्रशासनाने आणखी कठोर उपाययोजना सुरु केल्या.
काही कालावधी वगळता जिल्ह्यातील जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना ठराविक कालावधीत सुरु ठेवण्याची परवानगी दिली. त्यानंतर शिथिलता मिळताच ८ जूनपासून जिल्ह्यातील सर्वच उद्योग सुरु करण्यात आले. तसेच बांधकामांनाही सुरुवात झाल्याने अनेंकांच्या हाताला कामही मिळाले. हळहळू आता रोजगार सुरु झाला असून लॉकडाऊननंतर जीवनमान पूर्वपदावर येत आहे. पण, अद्यापही काहींवर निर्बंध कायम असून नियमांच्या अधिन असलेली शिथिलता अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनाही आता वैताग ठरत आहे, हेही तितकेच खरे आहे.
महागाई वाढली का?
भाजीपाला : मागणी नसल्याच्या कारणाने लॉकडाऊन काळात शेतकºयांकडून कवडीमोल भावात भाजीपाला खरेदी करुन ग्राहकांना वाढीव दरात विकण्यात आला. आता मागणी वाढत असल्याने भाजीपाल्याचेही दर वाढले आहे. त्यामुळे सध्या शेतकºयालाही त्याचा फायदा होत आहे.
किराणा : गेल्या तीन महिन्याच्या कालावधीत पेट्रोल-डिझेलचे भाव सतत वाढत असल्याने त्याचा परिणाम वाहतूक खर्चावर झाला आहे. त्यामुळे किराणा साहित्याच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. काही दुकानदारांनी तुटवड्याच्या नावावरही किलो मागे २ रुपयांपासून ५ रुपयांपर्यंत वाढ केल्याचे निदर्शनास आले आहे.
इतर आजार : कोरोना प्रकोपासोबत जिल्ह्यामध्ये सर्दी, खोकला, मलेरीया यासारखे नेहमीचे आजार कायम आहे. आरोग्य विभागाकडून कोरोनाच्या कालावधीत ११५० सर्वेक्षण पथकाच्या माध्यमातून १२ लाख व्यक्तीची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये सर्दी खोकला या आजाराचे १२३० तर सारीच्या आजाराचे १०८ रुग्ण आढळून आले. त्यांच्यावर तातडीने उपचार करुन त्यांना बरे करण्यात आले.
जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होण्यापूर्वीच उपाययोजना सुरु केल्याने कोरोनाचा प्रकोप थांबविता आला. महसूल विभाग, आरोग्य विभाग, नगरपालिका, पोलीस प्रशासन यांच्या सहकार्याने अद्यापही प्रतिबंधित उपाययोजनांची अंमलबजावणी सुरु आहे.
कोरोना आटोक्यात आणण्यासाठीचे प्रयत्न
जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील ११२ मार्गावर सीमाबंदी करुन २४ तास निगराणी पथक नेमले. गर्दीच्या ठिकाणी हॅण्डवॉश, गर्दीच्या भाजी बाजारांचे स्थलांतरण, शहराबाहेर अनलोडींग पॉर्इंट, संपूर्ण कुटूंब विलगीकरणाचा ‘वर्धा पॅटर्न’, सर्वेक्षण पथकामार्फत नागरिकांची आरोग्य तपासणी, कंटेन्मेंट झोनमध्ये सिसिटीव्हीची नजर, सिक्स मिनिट वॉक व एक मिनिट सिट-अप टेस्ट यासह हॅण्ड वॉश, सोशल डिस्टंन्सिंग आणि मास्कचा वापर या त्रिसुत्रीवर भर देत दंडात्मक कारवाईला गती दिली. त्यामुळेच नागरिकांमध्ये जनजागृती होऊन जिल्ह्यात कोरोनाला रोखण्यात यश आले.
काय सुरू?
चवथ्या लॉकडाऊनमध्ये शासनाने ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत खबरदारी घेऊन सर्व उद्योग सुरु करण्यास परवानगी दिली. त्यामुळे उत्तम गलवा मेटॅलिक्स, उत्तम गलवा स्टील व्हॅल्यू, महालक्ष्मी, व्हील्स इंडिया लि.गिमाटेक्स, पी.व्ही.टेक्स, अशा मोठ्या कंपन्यांसह सूत गिरण्या, प्लास्टीक इंडस्ट्रीज सुरु केल्या आहेत.
जिल्ह्यात जवळपास सर्वच उद्योग व कंपन्या सुरु झाल्या आहेत. काही कामगार निघून गेल्याने स्थानिकांना रोजगार मिळाला असला तरी बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. मागणी नसल्याने उत्पादनही घटले आहे. उद्योजक अडचणीत असून शासनाकडील थकीत अनुदान मिळाल्यास मदत होईल.
- प्रवीण हिवरे, अध्यक्ष, उद्योजक असोसिएशन
काय बंद?
जिल्हाधिकाºयांनी ३१ जुलैला काढलेल्या आदेशानुसार शाळा, महाविद्यालये, सर्व सिनेमागृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव यावरील बंदी अद्यापही कायम ठेवले आहे. हॉटेल्समधून फक्त पार्सल सुविधा सुरु आहे. तसेच सलून दुकाने सुरु केली असून कटींगलाच परवानगी देण्यात आली आहे.
सर्वात आधी चित्रपटगृह बंद करण्यात आले. यामुळे जीएसटी आणि महिनेवारी उत्पन्न असा एकूण ३ लाखांचा फटका एका महिन्यात बसत आहे. सोबतच कर्मचाºयाच्या वेतनाचा भार वेगळाच आहे. त्यामुळे शासनाने १ वर्षाकरिता जीएसटीतून आणि शो टॅक्समधून कायम सुट द्यावी.
- प्रदीप बजाज, संचालक चित्रपटगृह.
या महामारीच्या काळात नागरिकांसह विविध सामाजिक संस्थांचेही सहकार्य मिळाल्याने कोरोनाचा रिकव्हरी रेट ८५ टक्केपर्यंत पोहोचविण्यात यश आले आहे.
- विवेक भिमनवार, जिल्हाधिकारी