‘लॉकडाऊन इफेक्ट’; शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला मिळतोय मातीमोल दर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 09:02 AM2021-05-26T09:02:07+5:302021-05-26T09:02:27+5:30
Wardha news कोरोना संक्रमण रोखण्यासाठी शासनाने घेतलेला संचारबंदी, जमावबंदीच्या निर्णय योग्य जरी असला तरी, या निर्णयाचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसला असून, त्यांना मातीमोल भावात भाजीपाला विकावा लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शहरी भागासह गावखेड्यांतही थैमान घातले आहे. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी शासनाने घेतलेला संचारबंदी, जमावबंदीच्या निर्णय योग्य जरी असला तरी, या निर्णयाचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसला असून, त्यांना मातीमोल भावात भाजीपाला विकावा लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे.
विविध भाजीपाल्याला शहरासह ग्रामीण भागात मागणी असली तरी विक्री यंत्रणा कोलमडल्याने शेतकऱ्यांना शेतातील भाजीपाला फेकावा अथवा जनावरांना खायला घालावा लागतो. हीच अवस्था दुग्ध व्यवसायाची झाली आहे. परिसरातील तारासावंगा, साहूर, द्रुगवाडा, माणिकवाडा, वाडेगाव, जामगाव या गावांमधील शेतकरी कपाशी, सोयाबीन, भुईमूग, गहू, हरभरा या परंपरागत पिकांसोबत संत्रा व मोसंबीचे तसेच विविध प्रकारच्या भाजीपाल्याच्या पिकांचे उत्पादन घेतात. बहुतांश शेतकरी भाजीपाला कारंजा, आष्टी, अमरावती जिल्ह्यातील वरुड शहरात तसेच परिसरातील आठवडी बाजारात विकायला नेतात. मात्र, कोरोना संक्रमणकाळात पिकांचा उत्पादन खर्च वाढला असून, त्या तुलनेत उत्पन्न कमी झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. भाजीपाल्याला शहरात मोठी मागणी असतानाही तो शहरात विक्रीसाठी पाठविणे शक्य होत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाल्याचे शेतकऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
माझ्याकडे चार एकर शेती असून दोन एकरांत मी भेंडी, टोमॅटो व वांगी, इत्यादी भाजीपाल्याची लागवड दरवर्षी करतो; परंतु कोरोनाच्या संक्रमणकाळात बाजारपेठ उपलब्ध होत नसल्याने भाजीपाला जनावरांना खाण्यास द्यायची वेळ आली आहे. बराच भाजीपाला हा घरीच सडत आहे. असेच होत राहिले तर उत्पादनासाठी लावलेला खर्चही निघणे कठीण होणार आहे.
- सूरज मोगरे, शेतकरी, वाडेगाव.
शासनाने भाजीपाल्याच्या ‘होम डिलिव्हरी’साठी सूट दिली असली तरी पूर्वीसारखी भाजीपाल्याची विक्री होत नाही. कोरोना संक्रमणकाळात भाजीपाला विक्रीतून रोजची रोजी निघणेदेखील कठीण झाले आहे. त्यामुळे जगावे तरी कसे, घरखर्च कसा चालवावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
- कुंदन लेंभाडे, भाजीपाला विक्रेता