संतप्त गावकऱ्यांनी ठोकले शाळेला कुलूप
By admin | Published: September 4, 2016 12:31 AM2016-09-04T00:31:42+5:302016-09-04T00:31:42+5:30
तालुक्यातील धोची येथील शाळेला कामयस्वरूपी शिक्षकाची मागणी गावकऱ्यांनी केली होती.
पाच वर्गांकरिता एकच शिक्षक : दोन वर्षांत आठ तक्रारी
हिंगणघाट : तालुक्यातील धोची येथील शाळेला कामयस्वरूपी शिक्षकाची मागणी गावकऱ्यांनी केली होती. आठ वेळा तक्रार देऊनही याकडे दुर्लक्ष झाल्याने अखेर शनिवारी संतप्त गावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकले. यावेळी गावकऱ्यांनी जोपर्यंत कायम स्वरूपी शिक्षक पाठवत नाही, तोपर्यंत शाळेचे कुलूप उघडणार नाही, असा इशारा दिला आहे.
जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या धोची या ४०० लोकसंख्येच्या गावात जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेत १ ते ५ वर्ग भरत असून ४७ विद्यार्थी आहेत. या शाळेतून २८ जुलै २०१४ पासून प्रकाश घवघवे नामक शिक्षकाची घाटसावली येथे बदली झाली होती. त्यांच्या जागेवर गोपाल शिंदे नामक शिक्षक मुख्याध्यापक म्हणून काम सांभाळत असून तो व्यसनी असल्याचे गावकऱ्यांच्या निदर्यनास आले आहे. अशातच सदर शिक्षक कुणाला कुठलीही सूचना न देता शाळा उघड्यावर सोडून निघून जात असल्याचे अनेक वेळा गावकऱ्यांच्या निदर्शनास आले.
यामुळे २२ आॅगस्ट २०१६ रोजी याबाबत हिंगणघाट पंचायत समितीचे सभापती संजय तपासे यांना धोची वासीयांची तक्रार जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना दिली; मात्र त्यांच्याकडूनही कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
हिंगणघाट : या सर्व प्रकारामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. याकडे शिक्षण विभागाकडून याबाबत कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. यामुळे संतप्त गावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकण्याचा निर्णय घेतला. शाळेला कुलूप लावतेवेळी पं.स. सदस्य ओंकार मानकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजानन सालेकर, उपाध्यक्ष लटारी डंभारे, सरपंच प्रकाश बावणे, मधुकर डंभारे, विठोबा मानकर, वाल्मीक वाघ, तुळशीदास ठाकरे, उमेश सराटे, विलास कांबळे, कृष्णा नरूले, वैशाली दोडके, सूवर्णा डंभारे यांच्यासह गावकरी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)