Lok Sabha Election 2019; ५५ वर्ष काँग्रेसने सामान्यांना एप्रिल फूल बनविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 09:41 PM2019-04-04T21:41:09+5:302019-04-04T21:42:15+5:30
गेल्या पाच वर्षामध्ये देशामध्ये सामान्य गरिबांचा विकास व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाची गती वाढवित ती सामान्यापर्यंत नेली. काँग्रेसने म्हटले गरीबी हटवू; पण गरिबी हटली नाही. या देशातल्या सामान्यांना काँग्रेसने एप्रिल फूल बनविले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : गेल्या पाच वर्षामध्ये देशामध्ये सामान्य गरिबांचा विकास व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाची गती वाढवित ती सामान्यापर्यंत नेली. काँग्रेसने म्हटले गरीबी हटवू; पण गरिबी हटली नाही. या देशातल्या सामान्यांना काँग्रेसने एप्रिल फूल बनविले आहे. ही देशाच्या आत्मियतेची लढाई आहे. त्यामुळे देश कुणाच्या हाती द्यावा यासाठीची ही लढाई आहे. सामान्य माणसाचे हित सोडून स्वहीत जपण्याचे काम गेली अनेक वर्ष काँग्रेसने केल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आर्वी येथील जाहीर सभेतून केली.
आर्वी येथील गांधी चौकात लोकसभेचे भाजप व शिवसेना युतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी काँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ही निवडणुक देशाचं भविष्य घडविणारी आहे; हे भविष्य कुणाच्या हाती द्यावे हे आपल्याला ठरवायचे आहे. गेल्या पाच वर्षात भाजपाने विकासाचा झंझावात देशात व महाराष्ट्रात सुरू केला. महाराष्ट्रात ३२ हजार कोटी रूपये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला दिले. त्यापैकी ४६० कोटी रूपये एकट्या वर्धा जिल्ह्याला दिले आहे. कॉँग्रेसने १० वर्षात ५२ हजार कोटी रूपये दिले. ६ हजार रूपये शेतकऱ्यांना देणे ही सुरुवात आहे. तिजोरीत पैसा येत आहे. देशात परिवर्तन करण्याचे काम मोदी सरकार करीत आहे. खोटं बोलण्याचे काम कॉँग्रेस करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
विदर्भाचा सुपूत्र म्हणून मी शेतकऱ्यांच्या पाठिशी कायम उभा आहे. महाराष्ट्रात २५ हजार एकरावर सुक्ष्म सिंचन योजना लोअर वर्धावर सुरू असून ही योजना शेतकऱ्याचे भविष्य बदलविणारीच आहे. महाराष्ट्रामध्ये खºया अर्थाने विकासाची कामे खेचून आणली. आर्वी मतदार संघामध्ये पुढील काळात विविध योजनाच्या माध्यमातून विकास करण्याचेही यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. व्यासपीठावर सुधीर दिवे, माजी आमदार दादाराव केचे, खासदार रामदास तडस, शिवसेनेचे माजी खासदार अनंत गुढे, शहागडकर, रिपाइंचे नेते विजय आगलावे, नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे आदींची उपस्थिती होती.