Lok Sabha Election 2019; १४ उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 10:36 PM2019-04-11T22:36:35+5:302019-04-11T22:38:07+5:30

वर्धा लोकसभा मतदारक्षेत्रात गुरूवारी झालेल्या मतदानात सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकूण मतदारांपैकी ५५.३८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी उशिरापर्यंत अनेक मतदान केंद्रांवर मतदान सुरूच होते. त्यामुळे मतदानाचा टक्का ६५ पार होईल, अशी शक्यता आहे.

Lok Sabha Election 2019; The fate of 14 candidates is EVM closure | Lok Sabha Election 2019; १४ उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम बंद

Lok Sabha Election 2019; १४ उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम बंद

Next
ठळक मुद्देसुमारे ६५ टक्के मतदान : काही ठिकाणी मशीनमध्ये आला होता क्षुल्लक तांत्रिक बिघाड

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा लोकसभा मतदारक्षेत्रात गुरूवारी झालेल्या मतदानात सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकूण मतदारांपैकी ५५.३८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी उशिरापर्यंत अनेक मतदान केंद्रांवर मतदान सुरूच होते. त्यामुळे मतदानाचा टक्का ६५ पार होईल, अशी शक्यता आहे. मतदानानंतर चौदाही उमेदवारांचे राजकीय भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले असून कुणाला बहुमताचा कौल मिळाला, हे आता मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.
वर्धा जिल्ह्यातील वर्धा, देवळी, हिंगणघाट, आर्वी आणि अमरावती जिल्ह्यातील धामणगाव (रेल्वे) व मोर्शी हे सहा विधानसभा क्षेत्र मिळून वर्धा लोकसभा क्षेत्राची निर्मिती करण्यात आली आहे. गुरूवारी निवडणुकीचा एक भाग म्हणून प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले. सकाळी ७.३० वाजतापासून मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली. सुरूवातीला काही ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये क्षुल्लक तांत्रिक दोष निर्माण झाल्याने मतदान केंद्रांवरील अधिकाऱ्यांसह मतदारांची तारांबळ उडाली होती. मात्र, त्यानंतर तज्ज्ञांनी वेळीच मतदान केंद्र गाठून तांत्रिक दोष दूर करून प्रक्रिया सुरळीत केली. गुरूवारी वाढत्या उन्हाची तमा न बाळगता शहरी व ग्रामीण भागातील मतदारांनी उत्साहाने मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावले. विशेष म्हणजे शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मतदान झाले आहे.
तज्ज्ञांनी दूर केला मशीनमधील तांत्रिक बिघाड
गुरूवारी मतदानासाठी मतदारांमध्ये सकाळपासूनच उत्साह असल्याचे बघावयास मिळाले. तर नवमतदार पहिल्यांदाच मतदान करणार असल्याने त्यांच्यात एक नवाच उत्साह होता. सकाळी ९ वाजेपर्यंत वर्धा लोकसभा मतदार क्षेत्रात ७.०२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर हा आकडा सकाळी ११ वाजता १५.७६ टक्केवर पोहोचला. मात्र, दुपारी पारा वाढल्याने मतदान प्रक्रिया कासवगतीनेच पुढे सरकत गेली. महाराष्ट्र वखार महामंडळ मतदान केंद्र क्रमांक २७३, पिपरी (मेघे) येथील जि.प. शाळासह आणखी काही मतदान केंद्रांवरील मशीनमध्ये क्षुल्लक तांत्रिक बिघाड आला होता. परिणामी, मतदान प्रक्रिया खोळंबली होती. मात्र, त्यानंतर तज्ज्ञांनी वेळीच दूर तो करून मतदान प्रक्रिया सुरळीत केली.
 

Web Title: Lok Sabha Election 2019; The fate of 14 candidates is EVM closure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.